माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त ; माओवाद्यांनी पुरुन ठेवलेले साहित्य गडचिरोली पोलीसांकडून नष्ट
* आत्मसमर्पित माओवाद्यांकडून मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे राबविण्यात आलेल्या अभियानादरम्यान विविध माओवादी साहित्य घटनास्थळीच करण्यात आले नष्ट
माओवादी शासनविरोधी विविध घातपाताच्या कारवाया करण्यासाठी विविध प्रकारचे शस्त्र व स्फोटक साहित्यांचा वापर सुरक्षा दलांना धोका पोहचविण्याच्या उद्देशाने गोपनियरित्या जंगल परिसरात जमीनीमध्ये पूरुन ठेवत असत. त्या साहित्याचा वापर माओवाद्यांकडून विविध नक्षल सप्ताह, निवडणूक इ. प्रसंगी सुरक्षा दलांवर घातपात करुन आणण्यास केला जात होता. गडचिरोली जिल्ह्रातील माओवाद आता संपूष्टात आला असून, माओवाद्यांनी जंगलामध्ये जमिनीत लपवून ठेवलेले साहित्य हस्तगत करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आले आहे.
सविस्तर वृत्त असे आहे की, दिनांक 16 मे 2026 रोजी ऑपरेशन अंतिम प्रहार अंतर्गत गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांची सखोल चौकशी केली असता, माओवाद्यांनी पोमकें बिनागुंडा हद्दीतील जंगल परिसरात शस्त्रनिर्मिती व इतर साहित्य लपवून ठेवले असल्याबाबतची माहिती मिळाल्याने दिनांंक 21 मे 2026 रोजी पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली सदर जंगल परिसरात विशेष अभियान पथक गडचिरोली व प्राणहिता यांच्या संयुक्त 06 तुकड्या व बिडीडीएसचे 02 पथक शोध अभियान राबविणे कामी रवाना करण्यात आले होते. दिनांक 22 मे 2026 रोजी पोमकें बिनागुंडाच्या उत्तरेकडील असलेल्या जंगल परिसरात विशेष अभियान पथकांकडून घेरा घालुन बिडीडीएसच्या जवानांनी सदर जंगल परिसराची कसून तपासणी केली असता, एक लेथ मशीन, बिजीएल पाईप्स, 12 बोअर पाईप, इन्व्हर्टर, जनरेटर, बॅटरी, ग्राइंडींग/ड्रिलींग मशीन, जीग सॉ मशीन, प्रेशर पंप, सोलर पॅनल, फुटबॉल पाईप (20 फुट) इ. माओवादी साहित्य हस्तगत करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आले आहे. मा. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळावरुन मिळालेले सर्व माओवादी साहित्य पथकातील जवानांच्या सहाय्याने जागीच नष्ट करण्यात आले.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज जी., पोलीस उप-अधीक्षक (अभियान) श्री. विशाल नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अभियान पथक, गडचिरोली, प्राणहिता व बीडीडीएस पथकातील जवानांनी यशस्वीरित्या पार पाडली असून, पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. एम. रमेश यांनी या कार्यवाहीत सहभागी जवानांचे कौतुक केले आहे.




