Home गडचिरोली गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई; दोन वेगवेगळ्या ठिकाणी दारू छाप्यांमध्ये साडेतीन लाखांचा मुद्देमाल...

गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई; दोन वेगवेगळ्या ठिकाणी दारू छाप्यांमध्ये साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त

174

​गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई; दोन वेगवेगळ्या ठिकाणी दारू छाप्यांमध्ये साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त
​गडचिरोली: गडचिरोली पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार पद.पो.कॉ. नरेश मेश्राम व पो.कॉ. नितीन शेरकी यांच्या पथकाने पारडी फाटा रोडवर दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये बेकायदेशीर रित्या विनापरवाना देशी-विदेशी दारू आणि बिअरची वाहतूक करणाऱ्या ४ आरोपींना अटक केली आहे. या दोन्ही कारवायांमध्ये एकूण ३ लाख २ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण ५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
​पहिली कारवाई: मुडझा येथील दोन आरोपी गजाआड, एक फरार
गडचिरोली ​पोलीस पेट्रोलिंगवर असताना गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी मौजा पारडी फाटा रोडवर सापळा रचला. निळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या सुझुकी एक्सेस दुचाकीवरून (क्र. MH ३३ AJ ०४७० आणि MH ३३ AH ५८८०) अवैध दारूची वाहतूक करताना विकास कवडु मेश्राम (वय २६) आणि अतुल दिवाकर मेश्राम (वय २६) दोघे रा. मुडझा यांना पंचांसमक्ष ताब्यात घेण्यात आले.
​त्यांच्याकडून रॉकेट देशी दारू संत्रा आणि रॉयल स्टॅग कंपनीच्या दारूच्या एकूण १४८ निपा आणि दोन दुचाकींसह एकूण १,५२,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चौकशीदरम्यान हा माल सोनू व्यंकटेश गड्डमवार (रा. मुडझा) याचा असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्यासह तिन्ही आरोपींवर कलम ६५ (अ) महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
​दुसरी कारवाई: चंद्रपूर जिल्ह्यातील दोन आरोपींना अटक
​त्याच दिवशी याच मार्गावर केलेल्या दुसऱ्या कारवाईत, सुझुकी एक्सेस दुचाकी (क्र. MH ३३ CP ९९१०) आणि विना क्रमांकाच्या ब्लॅक कलरच्या एक्सेस गाडीवरून (चेसीस क्र. MB८DP११AGJ८९५४७६०) दारूची वाहतूक करणाऱ्या रितीक जितेंद्र पिपरे (वय २३) व मुकेश मुर्लीधर रोहनकर (वय २७) दोन्ही रा. वाघोली, ता. सावली, जि. चंद्रपूर यांना अटक करण्यात आली.
​त्यांच्याकडून २०० नग रॉकेट देशी दारू संत्रा, हायवर्ड आणि बडवायझर मॅग्नम कंपनीचे एकूण ४८ बिअरचे टीन आणि दोन दुचाकींसह एकूण १,४९,२०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या दोन्ही आरोपींविरुद्ध देखील गडचिरोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
​सदर यशस्वी कारवाई गडचिरोली पोलीस स्टेशनचे पद.पो.कॉ. नरेश मेश्राम आणि पो.कॉ. नितीन शेरकी यांच्या पथकाने पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

Don`t copy text!