Home Breaking News “कार्तिक स्वामी महाराजांच्या नावाचा गैरवापर केल्याचा आरोप फेटाळला; संत मुलीधर महाराज विठ्ठलवार...

“कार्तिक स्वामी महाराजांच्या नावाचा गैरवापर केल्याचा आरोप फेटाळला; संत मुलीधर महाराज विठ्ठलवार गुज्जनवार यांचा सविस्तर खुलासा”

107

“कार्तिक स्वामी महाराजांच्या नावाचा गैरवापर केल्याचा आरोप फेटाळला; संत मुलीधर महाराज विठ्ठलवार गुज्जनवार यांचा सविस्तर खुलासा”

 

 

 

शासकीय विश्रामगृह, इंदिरा गांधी चौक येथे पत्रकार परिषद; चपराळा ट्रस्टच्या आक्षेपांना हरनघाट देवस्थान संचालन समितीचे मुद्देनिहाय उत्तर

 

 

गडचिरोली, दि. ८ जून :

चपराळा येथील श्री हनुमान मंदिर प्रशांत धाम ट्रस्टने उपस्थित केलेल्या विविध आक्षेपांवर श्री संत मुलीधर धाम कार्तिक स्वामी हनुमान मंदिर देवस्थान, हरनघाट (पारडी) संचालन समितीने आज शासकीय विश्रामगृह, इंदिरा गांधी चौक, गडचिरोली येथे आयोजित पत्रकार परिषदेत सविस्तर खुलासा केला. समितीचे अध्यक्ष संत मुलीधर महाराज विठ्ठलवार गुज्जनवार यांनी कार्तिक स्वामी महाराजांच्या नावाचा अथवा फोटोचा वापर करून देणग्या गोळा केल्याचा आरोप स्पष्ट शब्दांत फेटाळून लावला.

समितीने म्हटले की, कार्तिक स्वामी महाराजांच्या नावाचा प्रसिद्धीसाठी किंवा आर्थिक फायद्यासाठी कधीही वापर करण्यात आलेला नाही. तसेच पावती पुस्तकांवर कार्तिक स्वामी महाराजांचे छायाचित्र छापल्याचा आरोपही निराधार असून, त्याबाबत कोणताही पुरावा असल्यास तो सादर करावा, असे आव्हान करण्यात आले.

गुरू-शिष्य नात्याबाबत बोलताना संत मुलीधर महाराज यांनी सांगितले की, त्यांनी कार्तिक स्वामी महाराजांना गुरू मानले असून हिंदू धर्मपरंपरेनुसार कोणालाही गुरू मानण्याचा अधिकार आहे. त्यामुळे या विषयावर आक्षेप घेणे योग्य नसल्याचे त्यांनी नमूद केले.

हरनघाट ते चपराळा पालखी परंपरेबाबत समितीने स्पष्ट केले की, कार्तिक स्वामी महाराजांच्या निधनानंतर भक्तांच्या स्वयंप्रेरणेने ही पालखी सुरू करण्यात आली. पालखीमधून प्राप्त होणाऱ्या देणग्या व धान्य संबंधित ट्रस्टकडे नियमितपणे सुपूर्द करण्यात येत असून त्याचा हिशोब दोन्ही संस्थांकडे उपलब्ध असल्याचा दावा करण्यात आला.

सोशल मीडियावर आणि काही वृत्तवाहिन्यांवर प्रसिद्ध झालेल्या विभूती प्रकरणात कार्तिक स्वामी महाराज चपराळा यांचा कोणताही संबंध नसल्याचेही समितीने स्पष्ट केले. चुकीच्या माहितीमुळे गैरसमज निर्माण झाल्याचा आरोप करण्यात आला.

या पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष लच्छय्या मलय्या गद्देवार, सचिव सुभाष आडकुजी नागुलवार, सहसचिव अनिल मंसाराम कांमडी, कोषाध्यक्ष मुकेश मनोहर गुरनुले तसेच सदस्य नरेंद्र डोप्पाजी जक्कुलवार, भालचंद्र केवलराम राखडे, प्रकाश मारोती पाल, अतुल शामराव भिरकुरवार, सुनिल तुकारामजी बोमनवार आणि हरिदास देवाजी आभारे उपस्थित होते.

चपराळा ट्रस्टने केलेले सर्व आरोप बिनबुडाचे व तथ्यहीन असल्याचा दावा करत संचालन समितीने आपली भूमिका स्पष्ट केली. या खुलाशाच्या प्रती धर्मादाय आयुक्त, गडचिरोली, पोलीस निरीक्षक, सावली आणि पोलीस निरीक्षक, आष्टी यांनाही पाठविण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

Don`t copy text!