Home Breaking News *खनिज निधीच्या प्रभावी वापरातून दुर्गम भागांच्या सर्वांगीण विकासाला चालना; ‘डीएमएफ यशोगाथा –...

*खनिज निधीच्या प्रभावी वापरातून दुर्गम भागांच्या सर्वांगीण विकासाला चालना; ‘डीएमएफ यशोगाथा – भाग १’ पुस्तकाचे मुख्य सचिवांच्या हस्ते प्रकाशन*

8

*खनिज निधीच्या प्रभावी वापरातून दुर्गम भागांच्या सर्वांगीण विकासाला चालना; ‘डीएमएफ यशोगाथा – भाग १’ पुस्तकाचे मुख्य सचिवांच्या हस्ते प्रकाशन*

 

गडचिरोली, दि. ८ (जिमाका) : जिल्हा खनिज प्रतिष्ठान (डीएमएफ), यांच्या माध्यमातून खाण प्रभावित व दुर्गम भागांमध्ये राबविण्यात आलेल्या विकासात्मक उपक्रमांच्या यशस्वी वाटचालीचे दस्तऐवजीकरण करणाऱ्या ‘डीएमएफ यशोगाथा – भाग १’ या पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या हस्ते काल करण्यात आले. खनिज संपत्तीचा लाभ स्थानिक नागरिकांच्या जीवनमान उन्नतीसाठी आणि सर्वसमावेशक विकासासाठी कशा पद्धतीने उपयोगात आणला जात आहे, याची माहिती पुस्तकात दिली आहे.

विभागीय अपर आयुक्त माधवी खोडे, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, उमेदचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर, मुख्य वनसंरक्षक जी. पी. नरवणे, अपर जिल्हाधिकारी नितीन गावंडे याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते.

 

जिल्हाधिकारी तथा जिल्हा खनिज प्रतिष्ठानचे अध्यक्ष अविश्यांत पंडा यांनी नमूद केले की खाण प्रभावित आणि दुर्गम भागातील आदिवासी व ग्रामीण समुदायांपर्यंत विकासाची फळे पोहोचविण्यासाठी खनिज प्रतिष्ठानच्या माध्यमातून सातत्यपूर्ण प्रयत्न करण्यात येत आहेत. स्थानिक समुदाय, बचत गट, ग्रामपंचायती, विविध विभाग आणि प्रशासन यांच्या सक्रिय सहभागामुळे या उपक्रमांना यश मिळाले असून त्यातून शाश्वत विकासाची पायाभरणी झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

 

जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. इम्रान शेख यांनी सांगितले की डीएमएफ ही केवळ निधी उपलब्ध करून देणारी संस्था नसून खनिज संपत्तीचे रूपांतर सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणपूरक विकासात करणारे प्रभावी माध्यम आहे. भविष्यात खाण महसूल वाढल्यास अशा विकासात्मक उपक्रमांची व्याप्ती आणखी वाढणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

 

या पुस्तकामध्ये जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या १५ महत्त्वपूर्ण विकास उपक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. महिला बचत गटांमार्फत सॅनिटरी नॅपकिन उत्पादन, क्षयरुग्णांसाठी पोषण आहार सहाय्य, ‘मावा अस्काना लोन’ उपक्रम, गोटूलचे ज्ञानकेंद्रात रूपांतर, ‘प्रकल्प आदिशा’, कृषी उपकरण बँक, स्मार्ट शाळा, डिजिटल भाषा प्रयोगशाळा, पर्जन्यजल संधारण प्रकल्प, सौरऊर्जेवर आधारित पाणीपुरवठा व्यवस्था, जटायू सुपर मशीनद्वारे स्वच्छता व्यवस्थापन, मशरूम उत्पादन केंद्रे, बोअरवेल आधारित सिंचन सुविधा, लोह निर्मूलन प्रकल्प तसेच मत्स्यव्यवसाय विकास यांसारख्या उपक्रमांचा समावेश आहे.

 

महिला सक्षमीकरण, शिक्षणाचा दर्जा उंचावणे, सुरक्षित पिण्याचे पाणी, शेतकऱ्यांची उत्पादकता वाढ, ग्रामीण रोजगारनिर्मिती आणि शाश्वत विकास या क्षेत्रांमध्ये या उपक्रमांमुळे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. ‘डीएमएफ यशोगाथा – भाग १’ हे पुस्तक गडचिरोली जिल्ह्यातील विकासाच्या परिवर्तनशील प्रवासाचे दस्तऐवजीकरण करणारे महत्त्वपूर्ण प्रकाशन ठरेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

 

०००

Don`t copy text!