वर्ल्ड बायसिकल डे निमित्त गडचिरोलीत ‘संडे ऑन सायकल’ रॅली उत्साहात
गडचिरोली, दि. ९ (जिमाका) : वर्ल्ड बायसिकल डे निमित्त महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयांतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद, गडचिरोली तसेच विविध तालुका क्रीडा संकुल समित्या आणि सायकल स्नेही मंडळाच्या संयुक्त विद्यमाने ७ जून २०२६ रोजी जिल्हाभर ‘संडे ऑन सायकल’ रॅलीचे आयोजन करण्यात आले.
जिल्हा क्रीडा संकुल, गडचिरोली येथे मुख्य कार्यक्रम पार पडला. यावेळी शासकीय विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत झाकी, सायकल स्नेही मंडळाचे पदाधिकारी उदय धकाते, प्रा. विलास पारधी, उपेंद्र रोहणकर, अनिकेत शेगांवकर व जया शेगांवकर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे यांनी सायकल वापराचे महत्त्व अधोरेखित केले. प्रमुख अतिथींनी आरोग्य संवर्धन आणि पर्यावरण संरक्षणासाठी सायकलचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन केले. प्राचार्य प्रशांत झाकी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीला प्रारंभ करण्यात आला.
रॅलीत नागरिक, विद्यार्थी आणि खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. समारोपानंतर सहभागींसाठी अल्पोपहाराचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन खुशाल मस्के यांनी तर आभार प्रदर्शन विजय राठोड यांनी केले.





