दुचाकीला समोरून जोरदार धडक, २ सख्ख्या भावासह वृद्ध ठार
गडचिरोली जिल्हा मुख्यालयातील आरमोरी व चंद्रपूर मार्गावर मंगळवारी (दि. १४) झालेल्या अपघातात एका वृद्धासह २ सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. रमेश आडकू चलाख (६७, रा. नवेगाव) असे वृद्धाचे तर पुरुषोत्तम बाबुराव बारसागडे (३५) व अंकुश बाबुराव बारसागडे (३०, रा. हनुमान वॉर्ड, गडचिरोली) अशी मृतांची नावे आहेत. पहिली घटना चंद्रपूर मार्गावरील नवेगाव व दुसरी घटना आरमोरी मार्गावरील प्लॅटिनम ज्युबिली हायस्कूलजवळ घडली. पहिल्या घटनेत रमेश चलाख हा वृद्ध नवेगाव स्थित पेट्रोलपंपाजवळून रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात असताना चंद्रपूरकडून येणाऱ्या अल्पवयीन दुचाकीचालकाने वृद्धाला धडक दिली. यात रमेश चलाख गंभीर जखमी झाले. यात दुचाकीस्वारही जखमी झाला. गंभीर जखमी रमेश चलाख यांना उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, मुलावर सध्या उपचार सुरू आहेत. दुसरी घटना दुपारी आरमोरी मार्गावरील प्लॉटनम ज्युबिली हायस्कूलजवळ घडली. पुरुषोत्तम बारसागडे आणि अंकुश बारसागडे हे दोघे भाऊ आरमोरी मार्गावरील असलेल्या शेतातील धान पिकावर फवारणी करून दुचाकीवरून गडचिरोलीला परत येत होते. दरम्यान, गडचिरोलीहून आरमोरीकडे जाणाऱ्या एका भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. यात एकाचा जागीच मृत्यू तर दुसऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
आरमोरी मार्गावरील खड्ड्यांनी घेतला ‘बळी’
गत अनेक दिवसांपासून आरमोरी मार्गावरील कठाणी नदीपर्यंतच्या रस्त्याची फारच बकाल अवस्था झाली आहे. वारंवार मागणी करूनही या मार्गावरील खड्डे बुजविण्यात येत नसल्याने अपघाताच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अपघातामुळे जीवही गमवावा लागत आहे. विशेष म्हणजे, या मार्गावरून लोकप्रतिनिधी, प्रशासनातील अधिकारीही प्रवास करतात. मात्र, चारचाकी वाहनातून जाणाऱ्या या लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांना हे खड्डे दिसत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.