*परदेश दौऱ्यासाठी निवड झालेले सर्व शेतकरीच; निवड प्रक्रिया नियमानुसारच- कृषी विभागा खुलासा*
गडचिरोली दि. १२ ; प्रगतशेती अभ्यासाकरिता परदेश दौऱ्यासाठी निवड करण्यात आलेले सर्व शेतकरीच असून निवड प्रक्रिया ही शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आणि पूर्णपणे पारदर्शकपणे राबवण्यात आली असल्याचे तसेच दौऱ्यासाठीचा संपूर्ण खर्च शासनाकडून करण्यात येणार नसून फक्त 50 टक्के अनुदान देण्यात येणार असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर यांनी स्पष्ट केले आहे.
*पुरस्कार विजेत्यांना प्राधान्य आणि ५० टक्के अनुदान*
देशाबाहेरील शेतकरी अभ्यास दौऱ्यासाठी जिल्ह्याला एकूण पाच शेतकऱ्यांचा लक्षांक प्राप्त झाला होता. यानुसार, पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचा प्रस्ताव प्राधान्याने निवडण्यात आला. यामध्ये महाराष्ट्र शासनाचा ‘शेतीनिष्ठ पुरस्कार’ प्राप्त पद्मश्री परशुराम खुणे आणि महाराष्ट्र शासनाचा ‘वनश्री पुरस्कार’ प्राप्त चंद्रशेखर मुरतेली यांचा समावेश आहे. उर्वरित तीन शेतकऱ्यांची निवड दि. १४ ऑगस्ट २०२५ रोजी जिल्हास्तरीय समिती आणि उपस्थित अर्जदारांसमक्ष ईश्वर चिठ्ठी (लॉटरी) पध्दतीने करण्यात आली.
निवड झालेल्या शेतकऱ्यांना एकूण दौऱ्याच्या खर्चाच्या ५० टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त एक लक्ष रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल, ती अनुदान म्हणून देय आहे. उर्वरित खर्च शेतकऱ्यांनी स्वतः करावयाचा आहे. संपूर्ण सोडत प्रक्रियेचे चलचित्रीकरण (व्हिडीओ शुटींग) करण्यात आले आहे, असे कृषी विभागाने स्पष्ट केले.




