Home Breaking News मंदाताई एैडलावार यांच्या मृत्यूप्रकरणी आरोग्य मंत्र्यांसमोर जिल्हा शल्यचिकित्सकांना नगराध्यक्षांचा थेट सवाल

मंदाताई एैडलावार यांच्या मृत्यूप्रकरणी आरोग्य मंत्र्यांसमोर जिल्हा शल्यचिकित्सकांना नगराध्यक्षांचा थेट सवाल

84

मंदाताई एैडलावार यांच्या मृत्यूप्रकरणी आरोग्य मंत्र्यांसमोर जिल्हा शल्यचिकित्सकांना नगराध्यक्षांचा थेट सवाल

 

जिल्हा सामान्य रुग्णालयातील उपचार व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह; भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजनांची ठाम मागणी

 

जिल्हा सामान्य रुग्णालयातील कथित हलगर्जीपणावर कठोर कारवाईची मागणी

 

 

गडचिरोली : लांझेडा येथील मंदाताई विजय एैडलावार यांच्या १८ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या दुर्दैवी मृत्यू प्रकरणामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या संदर्भात नगराध्यक्ष अॅड. प्रणोती सागर निबोंरकर यांनी राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मा.ना. प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत जिल्हा शल्यचिकित्सकांना थेट प्रश्न उपस्थित केला.

 

सदर महिलेला वेळेवर आणि योग्य उपचार न मिळाल्याने त्यांची प्रकृती अधिकच गंभीर होत गेली व अखेरीस त्यांचा मृत्यू झाला. ही घटना जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली (कॉम्प्लेक्स) येथे घडल्याचे सांगितले जात आहे.

 

आरोग्यमंत्री गडचिरोली जिल्हा दौर्‍यावर असताना आयोजित बैठकीत नगराध्यक्षांनी हा गंभीर मुद्दा उपस्थित केला. संबंधित अधिकारी आणि आरोग्य विभागाच्या उपस्थितीत त्यांनी स्पष्ट शब्दांत सवाल केला — “जर रुग्णालयात वेळेवर उपचार मिळाले असते, तर एक जीव वाचू शकला असता ? ”

 

नगराध्यक्ष अॅड. प्रणोती सागर निबोंरकर यांनी सांगितले की, जिल्हा सामान्य रुग्णालय हे सर्वसामान्य नागरिकांसाठी जीवनदायी केंद्र आहे. येथे कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा, उपचारात विलंब किंवा वैद्यकीय अधिकाऱ्यांची निष्क्रियता सहन केली जाणार नाही. दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करून जबाबदारी निश्चित करावी, अशी ठाम मागणी त्यांनी केली.

 

तसेच, या घटनेची सखोल चौकशी करून अहवाल सार्वजनिक करावा आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस व परिणामकारक उपाययोजना राबवाव्यात, अशीही मागणी त्यांनी केली. जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम, जबाबदार आणि पारदर्शक व्हावी, हीच जनतेची अपेक्षा असल्याचे त्यांनी नमूद केले.

 

नगराध्यक्षांनी हा मुद्दा ठामपणे मांडल्यामुळे उपस्थित नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, संबंधित प्रकरणात तातडीने निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी पुढे येत आहे.

Don`t copy text!