गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने नवनिर्मित पोमकें बिनागुंडा येथे आरोग्य शिबिराचे करण्यात आले आयोजन
अतिदुर्गम बिनागुंडा, कुवाकोडी, फोदेवाडा व आसपासच्या अतिदुर्गम गावांतील एकूण २५० हून अधिक नागरिक व विद्याथ्यांची तज्ञ वैद्यकीय पथकाकडून तपासणी
पोलीस रुग्णालय गडचिरोली, जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली, जिल्हा परिषद गडचिरोली व सीआरपीएफ यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आला उपक्रम
गडचिरोली पोलीस दलाकडून जिल्ह्यातील नागरिकांसाठी वेळोवेळी विविध कल्याणकारी उपक्रम राबविले जात असतात. जिल्ह्यामधील अतिदुर्गम भागातील नागरिकांपर्यंत देखील आरोग्य सेवा पोहचविण्याच्या उद्देशाने गडचिरोली पोलीस दलाकडून विविध आरोग्य मेळावे आयोजित केले जात असतात. याच उपक्रमांचा एक भाग म्हणून गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने नवनिर्मित पोमके बिनागुंडा येथे पोलीस रुग्णालय गडचिरोली, जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली, जिल्हा परिषद गडचिरोली व सीआरपीएफ यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक १५ फेब्रुवारी २०२६ रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
अतिदुर्गम भागातील नागरिकांमध्ये आरोग्य सुविधांविषयी जनजागृती करुन नागरिकांना विविध आरोग्य तपासणी आणि औषधोपचार मिळवून देण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली सदर आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोलीच्या जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे (स्त्रीरोग तज्ञ), वैद्यकीय अधिक्षक महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली डॉ. माधुरी किलनाके (सर्जन), डॉ. प्रशांत पेंदाम (बालरोग तज्ञ), पोलीस रुग्णालय गडचिरोलीचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनिल मडावी, डॉ. गणेश चिचघरे तसेच ०९ बटा. सीआरपीएफचे वैद्यकीय अधिकारी डॉ. डी. एस. मोहन यांचे नेतृत्वात नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
सदर मेळाव्यादरम्यान हद्दीतील सुमारे २५० हून अधिक नागरिकांची विविध आजारांबाबत तपासणी करून आवश्यकतेनुसार नागरिकांना मोफत औषधे उपलब्ध करुन देण्यात आली तसेच विविध आजारांविषयी व पोषण समस्यांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी एकूण १४ नागरिकांना आवश्यकतेनुसार विविध रुग्णालयांच्या ठिकाणी पुढील तपासणीसाठी शिफारस केलेली आहे. तसेच बालरोग तज्ञांकडून शालेय विद्यार्थ्यांची तपासणी आणि स्त्रीरोग तज्ञांकडून गरोदर माता व इतर महिलांची तपासणी करण्यात येऊन आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले आहे. गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने सन २०२१ पासून आजपावेतो एकूण १७८ आरोग्य मेळाव्यांच्या माध्यमातून एकूण ४०,०१५ नागरिकांची आरोग्य तपासणी केलेली आहे. तसेच एकूण ०५ रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून एकूण ४,३६१ युनिट रक्ताचे संकलन करण्यात आले आहे. यासोबतच ऑपरेशन रोशनीच्या माध्यमातून एकूण ९,९७१ पेक्षा अधिक नागरिकांची नेत्र तपासणी करुन एकूण १,४१२ नागरिकांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे.
सदर शिबिराचे आयोजन पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल, मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. गडचिरोली श्री. सुहास गाडे, कमांडंट सीआरपीएफ ०९ बटा. श्री. शंभु कुमार, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री. कार्तिक मथीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज जी., पोलीस उप-अधीक्षक (अभियान) श्री. विशाल नागरगोजे तसेच प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड श्री. अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली नवनिर्मित पोमके बिनागुंडाचे प्रभारी अधिकारी सपोनि. रोहन पाटील यांच्या नेतृत्यात पोउपनि श्री. रोहन शिरसाट, श्री. सागर मोरे, श्री. शुभम भगत व अंमलदार यांनी यशस्वीरित्या पार पाडले.




