Home Breaking News गडचिरोली–उमरखेड भरधाव बस मुरखळा (नवेगाव) नजीक पलटली ; दोघांचा मृत्यू, अनेक प्रवासी...

गडचिरोली–उमरखेड भरधाव बस मुरखळा (नवेगाव) नजीक पलटली ; दोघांचा मृत्यू, अनेक प्रवासी जखमी

12

गडचिरोली–उमरखेड भरधाव बस मुरखळा (नवेगाव) नजीक पलटली ; दोघांचा मृत्यू, अनेक प्रवासी जखमी

 

गडचिरोली, दि. २१ : गडचिरोलीहून उमरखेडकडे निघालेल्या प्रवासी बसचा मुरखळा (नवेगाव) परिसरात भीषण अपघात झाला. भरधाव वेगातील बस वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला पलटी झाली. या भीषण दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. एका वर्षाच्या चिमुकल्याची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित बसमध्ये सुमारे ५० प्रवासी प्रवास करत होते. सुरजगड परिसरातील धोकादायक वळणावर अचानक बस पलटल्याने प्रवाशांमध्ये एकच आरडाओरड सुरू झाली. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.

स्थानिक नागरिकांनी तत्काळ बसमधील जखमी प्रवाशांना बाहेर काढून जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याने रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. डॉक्टरांकडून जखमींवर युद्धपातळीवर उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच आमदार डॉ. नरोटे यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात भेट देत जखमींची विचारपूस केली. तसेच संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना जखमींवर तातडीने आणि सर्वतोपरी उपचार करण्याच्या सूचना दिल्या.

दरम्यान, गंभीर अपघातानंतरही जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाड या उशिरा रुग्णालयात दाखल झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. अपघातातील जखमींवर उपचार सुरू असताना वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांच्या उशिरा उपस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

Don`t copy text!