सिरोंचा : पालक संपर्क मेळाव्यात शैक्षणिक विकासाचा संदेश
“शैक्षणिक विकास आणि जनसेवा शेवटच्या श्वासापर्यंत करू” – राजे अम्ब्रीशराव महाराज
सिरोंचा : येथील राजे धर्मराव विद्यालयात पालक संपर्क मेळावा व विद्यार्थी संवाद कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमात सेवानिवृत्त शिक्षक रमणजी कोम्मेरा यांचा सत्कार सोहळाही आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराज होते. प्रमुख पाहुणे म्हणून कुमार अवधेशराव बाबा आत्राम उपस्थित होते. तसेच प्राचार्य गणेश तगरे, माजी शिक्षक, माजी मुख्याध्यापक तसेच शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांनी राजे अम्ब्रीशराव महाराज यांचे उत्साहपूर्ण स्वागत केले. यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, धर्मराव शिक्षण मंडळाची स्थापना कै. श्रीमंत राजे विश्वेश्वरराव महाराज यांनी चंद्रपूर–गडचिरोली जिल्ह्यात शैक्षणिक क्रांती व सामाजिक सेवा घडवून आणण्यासाठी केली होती. त्यानंतर कै. श्रीमंत राजे सत्यवानराव महाराज यांनी या कार्याचा विस्तार केला. “आम्हीही शैक्षणिक विकास आणि जनसेवा हा महामंत्र जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत जोपासत राहू,” असे ते म्हणाले.
राजे धर्मराव विद्यालयाचे मुख्याध्यापक गणेश तगरे यांच्या नियोजनबद्ध कामकाज, शिस्त व प्रामाणिकतेमुळे शाळा प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी नमूद केले. पालकांनी शाळेवरील विश्वास कायम ठेवावा व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी शिक्षकांना सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी राजे अम्ब्रीशराव महाराज यांच्या हस्ते सेवानिवृत्त शिक्षक रमणजी कोम्मेरा यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. त्यांच्या दीर्घकाळाच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा गौरव करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्राचार्य गणेश तगरे यांनी केले. या कार्यक्रमाला पालक, विद्यार्थी, शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





