*रात्रीही आंदोलन कायम; तहसील कार्यालयासमोर ग्रामस्थांचा ठिय्या – “रस्त्याच्या मंजुरीशिवाय माघार नाही”*
भामरागड (प्रतिनिधी):
भामरागड तालुक्यातील भटपार परिसरातील रस्त्यांच्या दुरवस्थेविरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (भाकपा) नेतृत्वाखाली सुरू असलेले बेमुद्दत आंदोलन अधिक तीव्र झाले असून, आंदोलनकर्त्यांनी तहसील कार्यालयासमोर ठिय्या देत रात्रभर जागरण केले. दोन दिवसांपासून शेकडो आदिवासी ग्रामस्थ कार्यालयासमोरच झोपून आंदोलन सुरू ठेवत आहेत, मात्र प्रशासन अद्यापही निष्क्रिय असल्याचा आरोप होत आहे.
भटपार ते दर्भा आणि भटपार ते घोटपाडी या अत्यंत महत्त्वाच्या रस्त्यांची अवस्था अतिशय खराब असून, या मार्गांवरून दळणवळण करताना ग्रामस्थांना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. या रस्त्यांच्या कामांना अधिकृत मंजुरी मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा ठाम इशारा भाकपाच्या वतीने देण्यात आला आहे.
प्रशासनाकडून ठोस निर्णय न मिळाल्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली असून, आंदोलनाला दिवसेंदिवस व्यापक पाठिंबा मिळत आहे. महिलांपासून तरुणांपर्यंत सर्वच घटक मोठ्या संख्येने सहभागी झाले असून, रात्रीच्या थंडीची पर्वा न करता ते संघर्ष करत आहेत.
या आंदोलनाचे नेतृत्व कॉ. सचिन मोतकुरवार यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून, स्थानिक भाकपा कार्यकर्ते व उपसरपंच सरजू मज्जी व ग्रामस्थ आघाडीवर आहेत. “आदिवासी दोन दिवसांपासून तहसील कार्यालयासमोर झोपून आंदोलन करत आहेत, तरीही प्रशासनाला जाग येत नाही. आदिवासींसाठी निधी नाही, मात्र गडचिरोली जिल्ह्यात उद्योगपतींसाठी निधी उपलब्ध होतो का?” असा थेट सवाल भाकपाने उपस्थित केला आहे.
दरम्यान, प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून रस्त्यांच्या कामांना मंजुरी द्यावी, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पुढील घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





