Home Breaking News गोरगुटाटा येथील ट्रान्सफॉर्मर तात्काळ बदला; भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा इशारा

गोरगुटाटा येथील ट्रान्सफॉर्मर तात्काळ बदला; भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा इशारा

36

गोरगुटाटा येथील ट्रान्सफॉर्मर तात्काळ बदला; भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा इशारा

 

एटापल्ली (प्रतिनिधी):

तालुक्यातील गट्टा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गोरगुटाटा येथील विद्युत ट्रान्सफॉर्मर गेल्या अनेक दिवसांपासून जळाल्याने संपूर्ण गाव अंधारात आहे. या समस्येमुळे त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी अखेर भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडे (भाकपा) धाव घेत दाद मागितली आहे. नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत भाकपाचे जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार यांनी महावितरणने हा ट्रान्सफॉर्मर तात्काळ बदलून नवीन बसवावा, अशी आग्रही मागणी केली आहे.

नागरिकांचे हाल, प्रशासनाचे दुर्लक्ष

मिळालेल्या माहितीनुसार, गोरगुटाटा येथील ट्रान्सफॉर्मर खराब झाल्यामुळे गावातील वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे. सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढत असल्याने विजेअभावी नागरिकांचे जगणे असह्य झाले आहे. रात्रीच्या वेळी अंधारामुळे चोऱ्यांचे आणि वन्य प्राण्यांचे भय निर्माण झाले असून, पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. वारंवार पाठपुरावा करूनही वीज विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

कॉ. सचिन मोतकुरवार यांचा पुढाकार

गावातील शिष्टमंडळाने कॉ. सचिन मोतकुरवार यांची भेट घेऊन आपली समस्या मांडली. त्यानंतर मोतकुरवार यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली. “एकीकडे सरकार डिजिटल इंडियाच्या गप्पा मारत असताना, दुसरीकडे एटापल्लीसारख्या दुर्गम भागातील गावांना मूलभूत वीज सुविधेसाठी वणवण करावी लागत आहे. उन्हाळ्याच्या दिवसात नागरिकांना वेठीस धरणे चुकीचे आहे,” असे मोतकुरवार यांनी यावेळी नमूद केले.

प्रशासनाला इशारा

भाकपाने संबंधित विभागाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जर गोरगुटाटा येथील खराब ट्रान्सफॉर्मर येत्या काही दिवसांत बदलून नवीन बसवला नाही, तर भारतीय कम्युनिस्ट पक्ष नागरिकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडेल.

“गोरगुटाटा येथील नागरिक मागील अनेक दिवसांपासून अंधारात आहेत. प्रशासनाने तांत्रिक कारणांचे रडगाणे न गाता, तातडीने नवीन ट्रान्सफॉर्मर बसवून वीजपुरवठा सुरळीत करावा.”कॉ. सचिन मोतकुरवार जिल्हा सहसचिव, भाकपा.

Don`t copy text!