Home Breaking News देवरीत भीषण अपघात : ट्रेलरच्या धडकेत दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू

देवरीत भीषण अपघात : ट्रेलरच्या धडकेत दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू

53

देवरीत भीषण अपघात : ट्रेलरच्या धडकेत दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू

आई गंभीर जखमी; शहारे व जांभुळकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर

नवेगावबांध, दि. १२ (प्रतिनिधी) : नवेगावबांध–कोहमारा राज्य महामार्गावर शनिवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला असून एक महिला गंभीर जखमी झाली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे देवरी व चारभाटा परिसरात शोककळा पसरली आहे.

मृतांमध्ये अंकुर अरुण शहारे (वय १९, रा. देवरी, जि. गोंदिया) व कु. रितिका संजय जांभुळकर (वय १२, रा. चारभाटा, ता. देवरी) यांचा समावेश आहे. तर अरुणा अरुण शहारे (वय ५०, रा. देवरी) या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर गोंदिया येथे उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि.११) सायंकाळी सुमारे ६.४५ वाजण्याच्या सुमारास अरुणा शहारे या आपल्या मुलगा अंकुर व नातेवाईक रितिका हिला घेऊन टीव्हीएस ज्युपिटर (क्रमांक MH-35 AY-2002) या स्कूटीने देवरीहून बोळदे येथील विवाह स्वागत समारंभाला जाण्यासाठी निघाल्या होत्या.

दरम्यान, नवेगावबांधपासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर कोहमाराच्या दिशेने जाणाऱ्या टाटा कंपनीच्या १४ चक्का ट्रेलर ट्रकने (क्रमांक CG-07 BG-7305) स्कूटीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की स्कूटीवरील अंकुर व रितिका यांचा जागीच मृत्यू झाला, तर अरुणा शहारे या गंभीर जखमी होऊन स्कूटीत अडकल्या.

अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळी न थांबता फरार झाला. मात्र नवेगावबांध पोलिसांनी तत्परता दाखवत परसोडी गावाजवळ ट्रेलर ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात जमा केला.

प्रत्यक्षदर्शीची माहिती

प्रत्यक्षदर्शी रोशन धनिराम झोळे (रा. पांढरवाणी, झोडेटोली) यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, संबंधित ट्रेलर भरधाव वेगाने जात होता. ओव्हरटेक करताना समोरून येणाऱ्या स्कूटीला त्याने जोरदार धडक दिली.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी अरुणा शहारे यांना पोलिसांच्या वाहनातून ग्रामीण रुग्णालय नवेगावबांध येथे दाखल करण्यात आले. तसेच रोशन झोळे व अमोल कापगते यांनी मृतदेह रुग्णवाहिकेतून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात आणले.

अरुणा शहारे यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालय गोंदिया येथे हलविण्यात आले असून सध्या त्या एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.

शिक्षण घेत असलेले विद्यार्थी

मृतक अंकुर शहारे हा देवरी येथील मनोहरभाई पटेल ज्युनिअर कॉलेजमध्ये इयत्ता १२ वीचा विद्यार्थी होता. नुकतीच त्याने बारावीची परीक्षा दिली होती. तर कु. रितिका जांभुळकर ही देवरी येथे आपल्या मामीकडे राहून मनोहरभाई पटेल विद्यालयात इयत्ता चौथीत शिक्षण घेत होती.

अंकुर हा अरुणा शहारे यांचा एकुलता एक मुलगा होता. त्यांच्या पतींचा काही वर्षांपूर्वी कोरोनामुळे मृत्यू झाल्याने या दुर्दैवी घटनेमुळे शहारे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

रविवारी (दि.१२) सकाळी १०.१५ वाजता ग्रामीण रुग्णालय नवेगावबांध येथे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर दोन्ही मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. देवरी येथील स्थानिक मोक्षधामावर शोकाकुल वातावरणात अंकुर व रितिका यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

या दुर्दैवी अपघातामुळे देवरी, चारभाटा व बोळदे कवठा परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

गुन्हा दाखल

या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी रोशन झोळे यांच्या तक्रारीवरून नवेगावबांध पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध अपराध क्रमांक ९७/२०२६ नोंदविला आहे. भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०६(१), २८१, १२५(ब) तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ व १३४(अ)(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या अपघाताचा पुढील तपास नवेगावबांध पोलीस ठाण्याचे ठाणेदार अजित पाटील करीत असून फरार चालकाला लवकरच अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Don`t copy text!