गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी ईशा पोरेड्डीवार; पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून इतिहास
उपाध्यक्षपदी क्षिरसागर नाकाडे, मानद सचिवपदी दीपक निंबेकर बिनविरोध
गडचिरोली :
सहकार क्षेत्रात राज्य व देशपातळीवर आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी उच्चशिक्षित ईशा प्रचीत पोरेड्डीवार यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीमुळे त्या बँकेच्या इतिहासातील पहिल्या महिला अध्यक्ष ठरल्या आहेत. उपाध्यक्षपदी क्षिरसागर नाकाडे तर मानद सचिवपदी दीपक निंबेकर यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली.
बँकेच्या सभागृहात १५ एप्रिल रोजी अध्यक्ष, उपाध्यक्ष व मानद सचिव पदासाठी निवड प्रक्रिया पार पडली. या सभेला बँकेचे सर्व संचालक उपस्थित होते. अध्यक्षपदासाठी ईशा प्रचीत पोरेड्डीवार, उपाध्यक्षपदासाठी क्षिरसागर नाकाडे आणि मानद सचिवपदासाठी दीपक निंबेकर यांचे प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्याने तिन्ही पदांची निवड बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी दिनेश चंदेल यांनी जाहीर केले.
सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते सहकार महर्षी अरविंद सावकार पोरेड्डीवार यांनी योग्य नियोजन आणि दीर्घ अनुभवाच्या बळावर बँकेचे २१ संचालक अविरोध निवडून आणत आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.
नवनिर्वाचित अध्यक्ष ईशा पोरेड्डीवार या सहकार महर्षी अरविंद सावकार पोरेड्डीवार यांच्या सून असून बँकेचे माजी अध्यक्ष प्रचीत सावकार पोरेड्डीवार यांच्या पत्नी आहेत.
निवड सभेला सहकार महर्षी अरविंद सावकार पोरेड्डीवार, नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रकाश सावकार पोरेड्डीवार, माजी अध्यक्ष प्रचीत पोरेड्डीवार, श्रीहरी भंडारीवार, अनंत साळवे, डॉ. दुर्वेश भोयर तसेच बँकेच्या नवनियुक्त संचालक छाया पोरेड्डीवार, निलीमा पोरेड्डीवार यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते.
सभेचे संचालन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार यांनी केले. यावेळी नवनिर्वाचित पदाधिकारी व संचालकांचे माजी संचालक आणि मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
.





