९४ वर्षीय रुग्णावर गडचिरोलीत यशस्वी शस्त्रक्रिया
मुत्राशयातील ४ इंचाचा मुतखडा काढला
गडचिरोली : मुत्राशयात असलेल्या अतिशय गुंतागुंतीच्या आणि दुर्मिळ प्रकारचा मुतखडा काढण्यासाठी गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या टिमने प्रयत्न केले आणि ९४ वर्षीय वयोवृद्ध रुग्णाच्या मुत्राशयातील मुतखडा यशस्वीपणे बाहेर काढून शस्त्रक्रिया यशस्वी केली.
तालुक्यातील पुलखल येथील ९४ वर्षीय सितकुरा धर्मा जराते यांना वर्षभरापूर्वी लकव्याच्या व्याधीने ग्रासलेले होते. दरम्यान दहा दिवसांच्यापूर्वी लकव्याचा सौम्य झटका आल्याने त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांना लघवीचा त्रास उद्भवल्या नंतर त्यांची तपासणी करण्यात आल्यावर मुत्राशयात चार सेंटीमीटरचा दुर्मिळ पध्दतीचा मुतखडा असल्याचे आढळून आले होते. दरम्यान आज शस्त्रक्रिया करण्यात येवून सदरचा मुतखडा यशस्वीपणे बाहेर काढण्यात आला.
गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी ९४ वर्षीय वयोवृद्धावर यशस्वी शस्त्रक्रिया करून दिलासा दिल्याबद्दल नातेवाईक आणि मित्रमंडळींनी डॉक्टर टिमचे आभार मानले आहेत.
सदरची शस्त्रक्रिया वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. अविनाश टेकडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.वर्षा लहाळे यांच्या नेतृत्वात सर्जन डॉ. आतिश मेश्राम, डॉ. प्रसाद खंडारे, गणेश टी. ए., डॉ. प्रभाकरन वी. सुंगणीतज्ज डाॅ. नागसेन साखरे, ओटी इन्चार्ज कविता नांदगाये, परिचारिका शितल रामटेके, समीक्षा मडावी, परिचर भास्कर नेवारे यांच्या टिमने सदरची शस्त्रक्रिया यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. या संपूर्ण शस्त्रक्रियेदरम्यान डाॅ. मनिष मेश्राम पूर्णवेळ उपस्थित होते.






