*आरटीई २५ टक्के मोफत प्रवेशासाठी शुल्क मागितल्यास शिक्षण विभागाकडे करा तक्रार- शिक्षणाधिकारी बाबासाहेब पवार*
गडचिरोली, (जिमाका) दि. १२ : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १२ (१) (सी) नुसार वंचित व दुर्बल घटकातील बालकांना स्वयंअर्थसहाय्यित शाळांमध्ये २५ टक्के जागांवर मोफत प्रवेश देण्यात येतो. या अंतर्गत शासनाच्या ऑनलाईन पोर्टलवर पालकांनी अर्ज केल्यानंतर लॉटरी पद्धतीने निवड झालेल्या बालकांचे प्रवेश संबंधित शाळांमध्ये निश्चित करण्यात येतात.
आरटीई २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रियेत निवड झालेल्या बालकांच्या सर्व कागदपत्रांची तपासणी करून अंतिम प्रवेश निश्चित केला जातो. मोफत प्रवेशांतर्गत प्रवेश घेतलेल्या बालकांचे शैक्षणिक शुल्क संबंधित शाळांना शासनाकडून अदा करण्यात येते. त्यामुळे अशा बालकांकडून कोणतेही शैक्षणिक शुल्क शाळांनी घेऊ नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
आरटीई २५ टक्के अंतर्गत प्रवेश मिळालेल्या बालकांच्या पालकांकडून शाळा शैक्षणिक शुल्काची मागणी करीत असल्यास पालकांनी पुराव्यासह तात्काळ गटशिक्षणाधिकारी, जिल्हा नोडल अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. तसेच ९८२३०१२६९१ या संपर्क क्रमांकावर किंवा ssagadchiroli@gmail.com या ई-मेलवर तक्रार नोंदवावी. प्राप्त तक्रारींची चौकशी करून दोषी शाळांवर नियमानुसार प्रशासकीय कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाबासाहेब पवार यांनी कळविले आहे.




