Home Breaking News लिहून ठेवा, पेट्रोल-डिझेल १४० ते १५० रुपये होईल : विजय वडेट्टीवार

लिहून ठेवा, पेट्रोल-डिझेल १४० ते १५० रुपये होईल : विजय वडेट्टीवार

21

लिहून ठेवा, पेट्रोल-डिझेल १४० ते १५० रुपये होईल : विजय वडेट्टीवार

गडचिरोली, ता. २६ : केंद्र व राज्यात सत्तेत असलेल्या भाजपमुळे देश उद्धवस्त होत आहे, कर्जात बुडत आहे. पुढच्या काही महिन्यांत पेट्रोल-डिझेल १४० ते १५० रुपये होईल, लिहून ठेवा, अशा शब्दात भाजप सरकारवर घणाघाती हल्ला काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केला.

काॅंग्रेसचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष अॅड. विश्वजीत कोवासे यांच्या पदग्रहण सोहळ्यात व शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. मंगळवार (ता. २६) सुरेश सावकार पोरेड्डीवार यांच्या घरासमोरील प्रांगणात झालेल्या या मेळाव्याला भारतीय युवक काँग्रेसचे आमदार रामदास मसराम, आमदार अॅड. अभिजीत वंजारी, माजी खासदार मारोतराव कोवासे, महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, महाराष्ट्र प्रभारी कुणाल चौधरी, आदिवासी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव पुरके,भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव अजय चिकारा, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव रवींद्र दरेकर,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव पंकज गुड्डेवार, जिल्हा परिषदचे माजी सदस्य राम मेश्राम, माजी नगरसेवक बंडू शनिवारे, कुसूम अलाम, माधुरी मडावी यांच्यासह काँग्रेसचे प्रमुख नेते उपस्थित होते. वडेट्टीवार पुढे म्हणाले की, मी २००८-०९ मध्ये अशोक चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होतो. आदर्श घोटाळ्यात त्यांचे पद गेले. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाले, मला मंत्रीपद दिले नाही. मी एक शब्द बोललो नाही. आज मी विधीमंडळ नेता आहे. पद येतात आणि जातात. पण पक्षनिष्ठा महत्त्वाची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काॅंग्रेसमुक्त भारतचा नारा दिला होता. पण काँग्रेसला मिटवणारा अजून पैदा झाला नाही. आज लोकं पेट्रोल पंपवर रांगा लावत आहेत आणि गोदी मीडिया मेलोडी चॉकलेटची चर्चा करत आहे. हा निर्लज्जपणाचा कळस आहे. अमेरीकेचे ट्रंप भाजपचे आका झाले आहेत. त्यांनी सांगितले म्हणून आम्ही इराण, रशियाकडून कच्चे तेल न घेता कॅलिफोर्नियावरून आयात करायला तयार झालो. पण तिथून कच्चे तेल यायला ५० दिवस लागतील, तर इराणमधून केवळ एक आठवडा लागेल. हा देश अदानी, अंबानीने विकून खाल्ला आहे. समृद्धी महामार्गाचा उल्लेख करत वडेट्टीवार म्हणाले की, समृद्धी महामार्गासाठी कोट्यावधी रुपयांत जमिनी घेतल्या कारण भाजपच्या लोकांनी त्या आधीच शेतकरी बांधवांकडून घेतल्या होत्या. गडचिरोली विमानतळासाठी तसा मोबदला का देत नाही? आम्हाला एकरी एक कोटी रूपये मोबदला द्या आणि विमानतळ, उद्योगासाठी शेतजमिनी नक्की देऊ, असेही ते म्हणाले. आमदार अॅड. अभिजीत वंजारी यांनीही समृद्धी महामार्गासाठी सरकारने चौपट मोबदला दिला, मग गडचिरोलीत का नाही, असा सवाल केला. आदिवासी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव पुरके म्हणाले की, राहुल गांधीशिवाय हा देश कोणीही वाचवू शकत नाही. ईडी, सीबीआयच्या भीतीने मी भाजपमध्ये जाणार नाही आणि एक दिवस मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाल्याशिवाय राहणार नाही. नवनियुक्त जिल्हाध्यक्ष अॅड. विश्वजीत कोवासे म्हणाले, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकीकडे सांगतात की गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त झाला आहे, पण सरकारच्या निष्ठूर धोरणांमुळे हा जिल्हा शेतकरीमुक्त होईल असे दिसत आहे. मला या सरकारच्या अन्यायाविरूद्ध लढायला आपल्या सर्वांची साथ लागेल, असेही ते म्हणाले. यावेळी इतर मान्यवरांनीही समयोचित विचार व्यक्त केले. कार्यक्रमला काॅंग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

———————————

Don`t copy text!