सुधारित आश्वासित प्रगती योजना खाजगी व्यवस्थापनाच्या शाळेतील कर्मचाऱ्यांना लागू करा
मराशीप ‘ संघटनेचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व शिक्षणमंत्री याना निवेदन
चामोर्शी :
राज्य शासकीय व अन्य कर्मचाऱ्यांप्रमाणे तीन लाभांकीत सेवा अंतर्गत सुधारित आश्वासित प्रगती योजना खाजगी व्यवस्थापनाच्या शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना लागू करण्यात यावी या मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद गडचिरोली यांनी शिक्षणमंत्री यांना दिले आहे. निवेदनात म्हटले की,
शासन निर्णयाच्या अनुषंगाने राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या १०,२० व ३० वर्षाच्या सेवेनंतर तीन लाभाची सुधारित आश्वासित प्रगती योजना लागू करण्यात आलेली आहे. आणि संदर्भ क्रमांक २ नुसार खाजगी व्यवस्थापनाच्या शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू करण्याची शिफारस अभ्यास गटाच्या दिनांक ६ मार्च २०२० रोजीच्या अंतिम बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार अभ्यास गटाच्या अंतिम अहवाल दिनांक ८ मे २०२० च्या पत्राद्वारे शासनास सादर करण्यात आलेला आहे.
यासंबंधी संदर्भ क्रमांक ७ ,९,१३ व १४ नुसार माझे आणि संदर्भ क्रमांक ८,१० व १५ नुसार माजी विधानसभा सदस्य नागो गाणार, यांनी आपल्या कार्यालयाला वेळोवेळी निवेदने दिलेली आहेत. तसेच संदर्भ क्रमांक ११ नुसार हारून आतार, शिक्षण उपसंचालक, अंदाज व नियोजन यांनी सुद्धा शिक्षण संचालक प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक, महाराष्ट्र राज्य पुणे यांना सदर विषयासंबंधी पत्र दिलेले आहे.
यासंबंधी अनेकदा निवेदने देऊन सुद्धा सदर निवेदनाची दखल अद्यापही घेण्यात आलेली नाही.आणि आपण निर्णय न घेतल्यामुळे व शालेय शिक्षण विभागास आपण आदेश न दिल्याने आणि शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्याकडून शासन निर्णय निर्गमित न झाल्यामुळे सर्व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला असून सदर लाभापासून प्रदीर्घ कालावधी पासून अजूनही वंचित आहेत.
तात्काळ शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचा शासन निर्णय निर्गमित करण्यात यावा. जेणेकरून संबंधित कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ मिळू शकेल. अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जिल्हा अध्यक्ष संतोष सुरावार यांनी केली आहे.




