अहेरी तालुक्यातील महागाव येथील धक्कादायक बातमी, एकाच कुटुंबातील चार जण व मावशी अशा पाच जणांचा पंधरा दिवसाच्या अंतराने रहस्यमय मृत्यू

128

अहेरी तालुक्यातील महागाव येथील धक्कादायक बातमी, एकाच कुटुंबातील चार जण व मावशी अशा पाच जणांचा पंधरा दिवसाच्या अंतराने रहस्यमय मृत्यू

अहेरी (प्रतिनिधी) : तालुका मुख्यालयापासून अवघ्या 7 किमी अंतरावर असलेल्या महागाव बुज येथील एकाच घरातील चार जण व मावशी अशा पाच जणांचा पंधरा दिवसाच्या अंतराने रहस्यमय मृत्यू झाल्याने अहेरी तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. या रहस्यमय मृत्यू श्रृंखलेचा उलगडा करण्याचे मोठे आव्हान अहेरी पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.

 

प्राप्त माहितीनुसार, शंकर तिरुजी कुंभारे यांचे महागाव बुज येथे फर्निचरचे दुकाने होते. त्यांना दोन मुले व एक मुलगी होती. मोठा मुलगा सागर हा दिल्ली येथे पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. रोशन शंकर कुंभारे (29), कोमल विनोद दहागावकर (31) हे धाकटे. रोशनचा डिसेंबर 2022 मध्ये अकोला जिल्ह्यातील पातूर येथील संघमित्रा गवई हिच्यासोबत प्रेमविवाह झाला.

 

कालांतराने संघमित्राच्या वडिलांचे पातूर येथे निधन झाल्याने सहा महिन्यांपर्यंत ती माहेरी होती. दरम्यानच्या काळात रोशनने पोस्टमास्तरची परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर पोस्टमास्तर म्हणून तो सिरोंचा येथे कार्यरत होता. तो तिथेच पत्नीसह वास्तव्याने राहत होता. घटनेच्या दोन महिन्यापूर्वी रोशन व पत्नी संघमित्रा हे दोघेही महागाव बुज येथे आले. दरम्यान, 22 सप्टेंबरच्या रात्री जेवण केल्यानंतर रोशनच्या आईला विजया शंकर कुंभारे हिला दुखी सुरू झाली. त्यामुळे पती शंकर कुंभारे यांनी तिला आलापल्ली येथील दवाखान्यात भरती केले. याच दरम्यान शंकर कुंभारे यांनाही अस्वस्थ्य वाटू लागल्याने महागाव बुज येथील राकेश मडावी या वाहन चालकाच्या मदतीने दोघांनाही चंद्रपूर येथील दवाखान्यात भरती करण्यात आले. मात्र प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यांना नागपूर येथील दवाखान्यात रेपर करण्यात आले.

 

एकाच कुटुंबातील चार आणि मावशी असे पाच जणांच्या लागोपाठ झालेल्या गूढ मृत्यूने अहेरी तालुका हादरला

 

एकाच कुटुंबातील चार आणि मावशी असे पाच जणांच्या लागोपाठ झालेल्या गूढ मृत्यूने अहेरी तालुका हादरला आहे. तालुक्यातील महागाव (बु.) येथे २४ तासांच्या अंतराने पती-पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर ८ ऑक्टोबरला विवाहित मुलीचा मृत्यू झाला. त्यानंतर १४ ऑक्टोबरला मध्यरात्री मावशीचा तर १५ ऑक्टोबरला सकाळी मुलानेही अखेरचा श्वास घेतला. सर्व जणांनी चंद्रपूर व नागपूर येथे उपचारादरम्यान प्राण सोडले. २० दिवसांत पाच जणांच्या गूढ मृत्यूसत्राने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

 

 

अहेरी तालुक्यातील महागाव येथे २२ सप्टेंबरला रात्री जेवण केल्यानंतर विजया शंकर कुंभारे (४५) यांची तब्येत बिघडली. डोकेदुखी व थकवा जाणवू लागल्याने स्वत:च्या कारमधून पती शंकर तिरूजी कुंभारे (५२) यांनी त्यांना चंद्रपूरला नेले. तेथे गेल्यावर त्यांनाही अस्वस्थ वाटू लागले, त्यामुळे तेही उपचारासाठी खासगी रुग्णालयात भरती झाले. प्रकृती अधिक बिघडल्याने दोघांना नागपूरला हलविले. पण उपचारादरम्यान २६ रोजी शंकर तर २७ रोजी विजया यांची प्राणज्योत मालवली.

 

आई-वडिलांची प्रकृती बिघडली तेव्हा विवाहित कन्या कोमल विनोद दहागावकर (२९,रा.गडअहेरी ता.अहेरी) माहेरी होती. त्यांचीही प्रकृती खालावली. तीन दिवस चंद्रपूर येथे उपचार केले. त्यानंतर त्यांची सुटी झाली. मात्र, पुन्हा अस्वस्थ वाटू लागल्याने अहेरी येथे ग्रामीण रुग्णालयात भरती केले. पण प्रकृती अधिक खालावल्याने चंद्रपूरला नेताना ८ ऑक्टोबरला वाटेत तिने प्राण सोडले.

 

शंकर कुंभारे यांचा मोठा मुलगा रोशन कुंभारे (२८) हा सिरोंचा येथे पोस्ट मास्तर पदावर कार्यरत आहे. आई- वडिलांच्या निधनानंतर गावी आल्यावर त्याचीही प्रकृती खालावली होती. चंद्रपूर येथे उपचारानंतर त्यास नागपूरला खासगी दवाखान्यात हलविले होते. १५ ऑक्टोबरला सकाळी आठ वाजताच्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, त्याची मावशी आनंदा उराडे (५०, रा. बेझगाव ता. मूल जि.चंद्रपूर) ही अंत्यविधीसाठी महागावला आली होती. ती देखील आजारी पडली. चंद्रपूर येथे खासगी दवाखान्यात उपचारादरम्यान १४ ऑक्टोबरला मध्यरात्री तिची प्राणज्योत मालवली.

 

*अहेरी तालुक्यात चर्चेचा बाजार रंगला*

 

एकाच कुटुंबातील ४ जणांचा मृत्यू झाल्याने अहेरी तालुक्यात खळबळ उडाली आहे. गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या मृत्यूबाबत गावातील कोणीही बोलायला तयार नाही. अन्नातून किंवा पाण्यातून विषबाधा झाल्यामुळे ही मृत्यूची साखळी निर्माण झाली होती का? हा मृत्यू अन्य कोणत्या कारणाने झाला, घात होता की काय, अशा वेगवेगळ्या चर्चांचा बाजार अहेरी परिसरात सुरू झाला आहे.

 

*सर्व दिशांनी तपास सुरू झाला*

 

कुंभारे कुटुंबीयांच्या मृत्यूबाबत सर्व दिशांनी तपासाचे काम सुरू आहे. संबंधित रुग्णालयाकडून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच तपासाचा वेग वाढेल.

मनोज कालबांधे (पोलिस निरीक्षक अहेरी)