केंद्र शासना प्रमाणे १ जुलै पासून ४ टक्के वाढीव महागाई भत्ता आदेश निर्गमित करा

126

– केंद्र शासना प्रमाणे १ जुलै पासून ४ टक्के वाढीव महागाई भत्ता आदेश निर्गमित करा

शिक्षक परिषद विभाग कोषाध्यक्ष संतोष सुरावार यांची मागणी

चामोर्शी:-

केंद्र शासनाने केंद्रीय कर्मचाऱ्यांना १ जुलै २०२३ पासून ४ टक्के वाढीव महागाई भत्ता लागू केला आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्य विधिमंडळाने एकमताने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयानुसार राज्य शासकीय कर्मचारी आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १ जुलै२०२३ पासून ४ टक्के वाढीव महागाई भत्ता लागू करण्याबाबत अद्यापही शासन निर्णय निर्गमित झालेला नाही. दिवाळी सारखा मोठा महत्त्वपूर्ण सण पुढील महिन्यात येत आहे. दिवाळीपूर्वी लाभ मिळण्यासाठी राज्यातील कर्मचारी मोठ्या आशेने आपल्या शासन निर्णयाची वाट पाहत आहेत. त्यासाठी आदेश निर्गमित करण्यात यावे यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, शिक्षण सचिव यांना निवेदन देऊन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद नागपूर विभाग कोषाध्यक्ष संतोष सुरावार यांनी मागणी केली आहे

केंद्र शासनाने घोषित केल्याप्रमाणे,राज्य शासकीय कर्मचारी आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुद्धा १ जुलै २०२३ पासून ४ टक्के वाढीव महागाई भत्ता देण्याबाबत शासन आदेश निर्गमित करून दिवाळीपूर्वी सदर आर्थिक लाभ जुलै महिन्यापासूनच थकबाकीसह मिळवून द्यावा. अशी मागणी निवेदनाद्वारे करून नागपूर विभागाचे माजी शिक्षक आमदार नागो गाणार यांनीही निवेदन देऊन पाठपुरावा केलेला आहे. सदर लाभाबाबत शासन निर्णय तात्काळ निर्गमित करण्यात यावा ही महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद विभाग कोषाध्यक्ष संतोष सुरावार तसेच माजी शिक्षक आमदार नागपूर विभाग यांनी केली आहे.