*लोककल्याणकारी योजनांचा लाभ घेऊन महिलांनी सक्षम व्हावे*

71

*लोककल्याणकारी योजनांचा लाभ घेऊन महिलांनी सक्षम व्हावे*

 

मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचे आवाहन

 

*आलापल्ली येथे महिला सक्षमीकरण अभियान*

 

आलापल्ली:-महिलांचा सक्षमीकरणासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून शासनाच्या विविध विभागाच्या लोक कल्याणकारी योजनांचा लाभ घेऊन महिलांनी सक्षम व्हावे,असे आवाहन राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी केले.

 

शासन आपल्या दारी अभियानाच्या धर्तीवर राज्य सरकारने महिला सक्षमीकरण हे नवे अभियान हाती घेतले असून अहेरी तालुक्यातील अल्लापल्ली येथील क्रीडा संकुल परिसरात ५ डिसेंबर रोजी पहिला मेळावा संपन्न झाला.या मेळाव्याचे उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अहेरीचे अपर जिल्हाधिकारी विजय भाकरे, सहाय्यक जिल्हाधिकारी,उपविभागीय अधिकारी तथा प्रकल्प अधिकारी वैभव वाघमारे, अहेरीचे तहसीलदार सुनील सौंदाणे,प्रभारी गटविकास अधिकारी राहुल वरठे,नायब तहसीलदार हमीद सय्यद,राष्ट्रवादी काँग्रेसचे अहेरी विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येर्रावार,आलापल्लीचे सरपंच शंकर मेश्राम,उपसरपंच विनोद अक्कनपल्लीवार,सदस्य सोमेश्वर रामटेके,सामाजिक कार्यकर्ते अरुण मुक्कावार आदी मान्यवर उपस्थित होते.

 

पुढे बोलताना एकविसाव्या शतकात वाटचाल करत असताना महिलांनाही पुरुषांच्या बरोबरीने घेऊन जावं लागेल,त्यांना दुय्यम स्थान देऊन चालणार नाही त्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समान अधिकार देण्याचा प्रयत्न केला.’शासन आपल्या दारी’ नंतर मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण हे दुसरे महत्वाचे अभियान आहे.या अभियानातून केवळ महिलांना मोठ्या प्रमाणात लाभ देण्यात येणार आहे. शासनामार्फत विविध लोककल्याणकारी योजना राबविण्यात येतात.त्यात जन्मापासून तर मृत्यू पर्यंत विविध योजनांचा समावेश आहे. मात्र,अजूनही बरेच योजनांची माहिती आपल्याकडे नाही.विशेष करून महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनेतून ज्यांना ज्या योजनांचा लाभ मिळाला आहे त्या योजना वगळून इतर योजनांचा लाभ देण्यासाठीच राज्यभरात महिला सक्षमीकरण अभियान राबविण्यात येत आहे.या माध्यमातून एकाच छताखाली सर्व विभागांचे स्टॉल लावण्यात आले असून त्या प्रत्येक स्टॉल मध्ये जाऊन विविध योजनांची माहिती घेऊन,कागदपत्रांची जुळवाजुळव करून प्रत्येक योजनांचा लाभ आपल्याला घ्यायचा आहे.त्यासाठी सुशिक्षित तरुण पिढीने देखील खेड्यापाड्यातील महिलांना मदत केली पाहिजे.जेणेकरून आपल्या गावातील महिला लोक कल्याणकारी योजना पासून वंचित राहणार नाही.असेही त्यांनी आवाहन केले.

 

प्रास्ताविकेत अहेरीचे तहसीलदार सुनील सौंदाणे यांनी विविध शासकीय योजनांची माहिती दिली.तर या नंतर होणाऱ्या विविध मेळाव्यात महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन देखील केले.प्रमुख पाहुणे म्हणून अपर जिल्हाधिकारी विजय भाकरे आणि सहाय्यक जिल्हाधिकारी वैभव वाघमारे यांनी उपस्थित महिलांना मोलाचे मार्गदर्शन करतानाच शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध लोककल्याणकारी योजनांचा पुरेपूर लाभ घेण्याचे आवाहन केले.

 

मेळाव्यात तहसील कार्यालय,पंचायत समिती विभागामार्फत विविध शाखांचे स्टॉल लावण्यात आले.तर,वन विभाग तसेच तालुका कृषी तसेच आदी विभागाचे सुद्धा स्टॉल लागले होते.मान्यवरांच्या हस्ते महिलांना विविध विभागाच्या योजनांचा लाभ देण्यात आला.यावेळी आलापल्ली लगत परिसरातील महिलांनी मोठी गर्दी केली होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळ अधिकारी एकनाथ चांदेकर यांनी केले.