घराबाहेर कसे पडायचे,चींतलपेठ चे नागरिक प्रचंड दहशतीत,वन विभागाकडून दुर्लक्ष

89

घराबाहेर कसे पडायचे,चींतलपेठ चे नागरिक प्रचंड दहशतीत,वन विभागाकडून दुर्लक्ष

अहेरी : ग्रामीण भागात प्रत्येकांकडेच शौचालय असते असे नाही. असेच चिंतलपेठचे आहे. शौचालय नसलेल्या घराबाहेर जाण्याची हिंमत होत नाही. कापसाने शेत शिवार बहरला आहे. कापूस लोंबकळत आहे. पण कापूस कसा वेचायचा हा प्रश्न चिंतलपेठ वासियांपुढे निर्माण झाला आहे. काल चिंतलपेठ येथील महिला सुषमा देविदास मंडळ हिला वाघाने ठार केले यामुळे चिंतलपेठ प्रचंड दहशतीत आहे. आमच्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष या गावाला भेट दिली असता चिंतलपेठ येथील वास्तव पुढे आले.

आलापल्ली -चंद्रपूर मार्गावरील मुत्तापूर या गावाजवळून फक्त पाच किलोमीटर अंतरावर चिंतलपेठ हे गाव आहे या गावात वर्ग १ ते ७ पर्यंत ची जिल्हा परिषद शाळा आहे. या शाळेच्या अगदी बाजूलाच काल ही घटना घडली. गावापासून आणि शाळेपासून हाकेच्या अंतरावर घडलेली ही घटना अनेक गावकऱ्यांनी प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितली. आरडा ओरड झाल्याने वाघ पळून गेला. वाघाच्या या हल्ल्यात 28 वर्षांपूर्वी किराणा दुकानानिमित्ताने मुल्चेरा तालुक्याच्या मथुरानगर येथील देविदास मंडल यांचे एकमेव बंगाली कुटुंब व्यवसाय निमित्याने आले. एकमेव बंगाली कुटूंब असले तरी पूर्णपणे मिसळले होते आणि या कुटुंबातील सुषमा देविदास मंडळ हिचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने संपूर्ण गाव चिंताग्रस्त झाला आहे. तर दुसरीकडे गावातल्या प्रत्येक व्यक्तीपुढे वाघाची दहशत उभी आहे. घराबाहेर निघण्यासाठी प्रत्येक व्यक्ती घाबरत आहे.

या गावात जवळपास दीडशे कुटुंब वास्तव्याने आहेत गावातल्या बहुतेकांचा व्यवसाय शेती हाच आहे. दोन ते पाच एकर दरम्यान बहुतेकांना शेती आहे काही शेतमजूर आहेत. यातील सगळेजण दरवर्षी कापसाची लागवड करतात. गावाच्या तीन ते चार किलोमीटरच्या परिघात गावातील बहुतेक व्यक्तींची शेती आहे यावर्षी पावसाळ्यात पावसाने शेवटी दगा दिल्याने कापसाला जास्त उत्पन्न नाही. अशा स्थितीमध्ये आता शेवटचा कापूस शेतात शिल्लक आहे हा कापूस येत्या पंधरा दिवसात कुठल्याही परिस्थितीत गोळा करणे आवश्यक आहे. कापूस तात्काळ गोळा केला नाही तर कापूस तुटून मातीत मिसळण्याची शक्यता जास्त आहे. कालच्या वाघाच्या हल्ल्याने गावातला कोणताच माणूस शेतात जाण्याची हिंमत करत नसून गावात चिंताग्रस्त अवस्थेत आहे. म्हणजे पावसानेही नुकसान आणि आता वाघाच्या दहशतीने नुकसान अशी अवस्था चिंतलपेठ वासीयांची झाली आहे.

वन विभाग दहशतीत

कालच्या हल्ल्याने संपूर्ण गाव दहशतीत असला तरी या दहशतीतून बाहेर काढण्याचे काम वन विभागाकडून होत नसल्याचे चित्र येथे दिसून आले. गस्तीच्य नावावर काल रात्री फक्त एकदा वनविभागाची गाडी गावात आली. वन विभागाची माणसं फक्त गावात फिरले. परत गेले. रात्रीच्या वेळेस वन विभागाच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना जंगलात फिरण्याची भीती वाटत होती. असे गावकऱ्यांनी सांगितले. आज सकाळी बारा वाजता पर्यंत वन विभागाचा एकही माणूस गावात आला नव्हता. गावात येऊन गावकऱ्यांची चर्चा करून त्यांना हिंमत देण्याचे काम वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी करायला पाहिजे पण या घटनेशी या विभागाला काहीही सोयर सुतक नसल्याचे दिसतं आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

अहेरी पासून अवघ्या बारा किलोमीटर अंतरावर असलेल्या चिंतन पेठ येथे घडलेली घटना स्थानिक परिसरात प्रचंड दहशत निर्माण करणारी आहे. गेल्या तीन चार दशकात अशी घटना घडल्याचे ऐकिवात नाही. घडलेली घटना अत्यंत गंभीर असल्याने प्रधान वनसंरक्षक, वनसंरक्षक, उपवनसंरक्षक या भारतीय वन सेवेतील अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देणे आवश्यक होते. घडलेल्या घटनेला दोन दिवसाचा कालावधी लोटलेला असताना सुद्धा वरिष्ठ दर्जाचा एकही अधिकारी गावात आला नाही गावकऱ्यांशी बोलला नाही घटनास्थळाला भेट दिली नाही. चौकशीच्या नावावर फक्त दोन सहाय्यक वन संरक्षक येथे आले होते.