प्रेमासाठी ऑस्ट्रियाच्या युवतीचे लग्न सावली तालुक्यातील गावात
(चंद्रपूर) : सावली तालुक्यातील दाबगाव मौशी येथील उच्चशिक्षित युवक नोकरीनिमित्त ऑस्ट्रिया या देशात गेला. तेथील युवतीच्या प्रेमात पडला. विदेशी युवतीला आपल्या गावात आणले व गावातच अतिशय साध्या पद्धतीने विवाह केला. ८ फेब्रुवारीला झालेल्या या अनोख्या प्रेमविवाहाची जिल्ह्यात व सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे.
आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेल्या सुकरू पाटील आभारे यांचा एकुलता एक मुलगा हेमंत उच्च शिक्षित असून विदेशातील एका कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत आहे. त्याचे ऑस्ट्रिया देशातील युडीश हरमायनी प्रित्झ, रा.बियेना ऑस्ट्रिया या युवतीशी प्रेमसंबंध जुळून आले.दरम्यान, दोघांनीही लग्न करण्याचे ठरवल्यानंतर थेट आपले गाव गाठले. आईवडिलांच्या परवानगीनंतर लग्नाची तारीख पक्की करण्यात आली. मात्र गावात समारंभयुक्त सभागृह नसल्याने थेट स्वतःच्या शेतातच लग्न करण्याचे ठरले. कोणताही मंडप किंवा बडेजावपणा न करता शेतातील एका झाडाखाली लग्नविधी सामाजिक रीतिरिवाजाप्रमाणे पार पाडण्यात आला. आधुनिक युगात नावीन्यपूर्ण आणि दिखाऊपणाचा
बाज न आणता जुन्या पद्धतीच्या बैलबंडीने वाजतगाजत वरात नेली. या समारंभाला अमेरिका, स्पेन, दक्षिण आफ्रिका, फिलिपीन्स, नेदरलॅन्ड, ऑस्ट्रियासह नऊ देशांतील वधूचे आप्त उपस्थित होते
लग्नमंडपापर्यंत जाण्यासाठी स्वखर्चाने रस्ता..
शेताकडे जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने कुटुंबीयांनी स्वखचनि सुमारे एक किमीपर्यंत मुरूम टाकून रस्ता तयार केला. त्यामुळे नातेवाईक, मित्रमंडळी व आप्तेष्टांची चारचाकी वाहने लग्न समारंभस्थळी सुखरूप पोहचली. या समारंभात विविध देशांतील मित्र, वधूचे नातेवाईक व वराचे संपूर्ण आप्तेष्ट उपस्थित होते. हा लग्न सोहळा पंचक्रोशीत चर्चेचा ठरत आहे.