*_हरांबा येथे १२ लाखांच्या व्यसनमुक्ती सामाजिक सभागृहाचे लोकार्पण – दिलेले आश्वासन पूर्ण झाल्याचा समाधानाचा क्षण.. मा.खा.डाँ. अशोकजी नेते यांनी व्यक्त केला_*
दि. २८ डिसेंबर २०२५ | हरांबा (ता. सावली, जि. चंद्रपूर)
मौजा हरांबा येथे माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री मान.डॉ. अशोकजी नेते यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून मंजूर केलेल्या १२ लाख रुपये खर्चाच्या व्यसनमुक्ती सामाजिक सभागृहाचे लोकार्पण आज उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. याआधी दिलेले आश्वासन प्रत्यक्षात उतरल्याने ग्रामस्थांमध्ये विशेष आनंदाचे वातावरण होते.
दरम्यान, महानगरपालिका निवडणुकां संदर्भात नागपूर येथे भाजपाच्या महत्त्वाच्या बैठकीस उपस्थित राहणे आवश्यक असल्याने मा.खा. डॉ. अशोकजी नेते स्वतः कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र त्यांच्या वतीने शुभेच्छा संदेश देण्यासाठी सोशल मीडिया प्रमुख दिवाकर गेडाम यांना कार्यक्रमस्थळी पाठविण्यात आले. चांगल्या व सामाजिकदृष्ट्या महत्त्वाच्या कार्यक्रमास प्रत्यक्ष उपस्थित राहता आले नाही, याबद्दल मा.खा. नेते यांनी दिलगिरी व्यक्त केली. तसेच या व्यसनमुक्ती सभागृहाचा समाजहितासाठी योग्य व प्रभावी उपयोग व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त करत सर्व उपस्थितांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
या व्यसनमुक्ती सामाजिक सभागृहाचा लोकार्पण सोहळा प.पू. सेषराव महाराजांचे अनुयायी प.पू. संतोषजी महाराज यांच्या शुभहस्ते पार पडला. हा क्षण हरांबा गावासाठी सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल ठरल्याची भावना उपस्थितांतून व्यक्त होत होती.
मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांनी लवकरच हरांबा येथील या सभागृहाला प्रत्यक्ष भेट देणार असल्याची ग्वाहीही दिली, यामुळे कार्यकर्ते व ग्रामस्थांमध्ये नवचैतन्य संचारले आहे.
यावेळी प.पू. संतोषजी महाराज यांनी लोकार्पणप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “हरांबा गावासाठी व्यसनमुक्तीच्या दृष्टीने हे सभागृह अत्यंत महत्त्वाचे असून, समाजातील व्यसनाधीनतेविरुद्ध लढा देण्यासाठी हे एक प्रभावी केंद्र ठरेल. मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून हे व्यसनमुक्ती सामाजिक सभागृह मंजूर करून दिले, ही बाब केवळ आर्थिक मदतीपुरती मर्यादित नसून समाजाच्या आरोग्यदायी भवितव्यासाठी घेतलेला दूरदृष्टीपूर्ण निर्णय आहे. या सभागृहाचा योग्य, सकारात्मक व विधायक उपयोग करून हरांबा गाव व्यसनमुक्तीकडे नेण्याचा आम्ही सर्वजण संकल्प करू,” असे त्यांनी ठामपणे नमूद केले.
त्यांच्या या प्रेरणादायी शब्दांनी उपस्थितांमध्ये सामाजिक बांधिलकीची जाणीव अधिक दृढ झाली असून, हे सभागृह निश्चितच व्यसनमुक्त समाजनिर्मितीसाठी मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.
या कार्यक्रमास माजी जि. प. बांधकाम सभापती संतोषभाऊ तंगडपल्लीवार, तालुकाध्यक्ष किशोरभाऊ वाकुडकर, व्यसनमुक्ती जिल्हाध्यक्ष अनिलजी डोंगरे, भाजपाचे ज्येष्ठ नेते देवरावजी सा. मुद्दमवार, ज्येष्ठ नेते ओमदेव पा. मंगर, व्यसनमुक्ती तालुकाध्यक्ष गुरुदेवजी चापडे, रूमाजी कोहळे, किशोर कारडे, मुकेश कांबळे तसेच व्यसनमुक्ती चळवळीचे जिल्ह्यातील अनेक अनुयायी बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हरांबा गावासाठी सामाजिक जागृती, व्यसनमुक्त समाजनिर्मिती आणि युवकांच्या सकारात्मक वाटचालीस चालना देणारे हे सभागृह भविष्यात प्रेरणास्थान ठरेल, असा विश्वास यावेळी उपस्थितांनी व्यक्त करण्यात आला.





