जिल्ह्यातील व्यवसाय शिक्षक न्यायाच्या प्रतीक्षेत
विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचे आढावा बैठकीचे आश्वासन
गडचिरोली- महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या समोर व्यवसाय शिक्षकांनी आपल्या अडचणी मांडल्या. जिल्ह्यात व्यवसाय शिक्षण योजना शालेय शिक्षण विभागाच्या समग्र शिक्षा, मुंबई या कार्यालया मार्फत राज्याबाहेरच्या विविध प्रायव्हेट कंपनीं व त्रयस्थ संस्था यांच्या मार्फत राबविली जात आहे. मागील नऊ वर्षा पासून व्यवसाय शिक्षकांना आणि त्यांच्या परिवाराला बाह्ययंत्रणेकडून कामे करून घेण्यासाठी नेमलेल्या सर्व व्होकेशनल ट्रेनर प्रोव्हायडर कंपन्यांकडून अतिशय मानसिक आणि आर्थिक पिळवणूकिला सामोरे जावे लागत आहे.
जिल्ह्यातील युवा आणि उच्च शिक्षित व्यवसाय शिक्षकांमुळे अतिदुर्बल व वंचित आदिवासी विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या या कौशल्याभिमुख व्यवसाय शिक्षण योजनेची गुणवत्ता वाढत आहे. परंतु विद्यार्थी स्वयंरोजगार होत असतांना मात्र त्यांना शिकवणाऱ्या व्यवसाय शिक्षकांची परीस्थिती अस्थिर होत आहे. व्यवसाय शिक्षकांना नऊ वर्षापासून अनियमित मिळणारे तुटपुंज्य वेतन, दर दोन वर्षांनी पुन्हा पुन्हा नवीन भरती प्रक्रियेला सामोरे जाने, आजतागायत न झालेली वेतनवाढ या सर्व बाबींमुळे होणारे आर्थिक आणि मानसिक खच्चीकरण हे कायमस्वरूपी बंद झाले पाहिजे या करिता व्यवसाय शिक्षकांनी महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या समोर आपल्या अडचणी सविस्तर मांडल्या. शासनाने राज्यातील युवा वर्गाचा हिताचा विचार करून बाह्ययंत्रणेकडून कामे करून घेण्यासाठी नेमलेल्या सर्व कंपन्यांचे करार नुकतेच रद्द केले आहे. परंतु व्यवसाय शिक्षण योजनेतील कंपन्यांचे करार रद्द झालेले नाही. त्यामुळे आपल्या जिल्ह्यात व्यवसाय शिक्षण योजनेतील कंपन्यामुळे मागील नऊ वर्षापासून त्रस्त असलेले व्यवसाय शिक्षकांना देखील या जुलमी निर्णयातून मुक्त करावे ह्या पोटतिडकीची मागणीचा विचार करावा अशी देखील विनंती या वेळी करण्यात आली.