गडचिरोली पोलिसांनी विध्वंसक कारवाया करण्यासाठी माओवाद्यांनी पुरुन ठेवलेले आयईडी केले नष्ट

38

गडचिरोली पोलिसांनी विध्वंसक कारवाया करण्यासाठी माओवाद्यांनी पुरुन ठेवलेले आयईडी केले नष्ट.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 दरम्यान आय.ई.डी. हल्ले करण्याच्या योजनेत माओवाद्यांनी टिपागड परिसरात काही स्फोटके आणि क्लेमोर माईन्स जमिनीत पुरुन ठेवली असल्याबाबतची विश्वासार्ह माहिती प्राप्त झाल्याने कोणत्याही संभाव्य घटना टाळण्यासाठी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 साठी त्या भागात क्षेत्राचे शोध अभियान राबविले आणि सुरक्षा दलांची जोरदार तैनाती करण्यात आली होती, ज्यामुळे माओवाद्यांना त्या वेळी या क्लेमोअर्स / स्फोटकांचा वापर करणे अशक्य होते. खात्रीशिर मिळालेल्या माहितीच्या आधारे काल टिपागड परिसरात एक निश्चित अचूक ठिकाण उघडकीस आले जिथे डोंगरावर ही स्फोटके आणि क्लेमोर माईन्स पुरुन ठेवण्यात आले होते.

मा. पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने 02 बी.डी.डी.एस. च्या पथकासह सी – 60 चे एक पथक आणि सी.आर.पी.एफचे एक क्यु.ए.टी पथक डंप शोध मोहिम राबविणेकामी आणि गरज पडल्यास तो नष्ट करण्यासाठी तैनात करण्यात आला. आज सकाळी जेव्हा पथके घटनास्थळी पोहोचली तेव्हा त्यांना स्फोटके आणि डिटोनेटरने भरलेले 06 प्रेशर कुकर आणि स्फोटकांनी आणि गंजलेले लोखंडी तुकडे भरलेले 03 क्लेमोर पाईप्स देखील सापडले. उर्वरित 3 क्लेमोर पाईप्स कोणतेही स्फोटक नसलेले होते. पथकांना त्याच ठिकाणी प्लास्टिकच्या पिशवीत गनपावडर, औषधे आणि ब्लँकेट सापडले. एकुण 9 आय.ई.डी. आणि 3 क्लेमोर पाईप्स बी.डी.डी.एस. पथकाच्या सहाय्याने घटनास्थळी नष्ट करण्यात आले.

तसेच घटनास्थळी असलेले उर्वरित साहित्य जागीच जळून खाक झाले आहे. पोलीस मदत केंद्रामध्ये आल्यानंतर गुन्हा नोदविण्याची तजवीज ठेवली आहे.