*गडचिरोलीत युवांसाठी विविध कौशल्य विकास प्रशिक्षण शिबिर*
गडचिरोली (दि. २ सप्टेंबर २०२५): जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने गडचिरोलीतील तरुण-तरुणींसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश जिल्ह्यातील तरुणांना विविध कौशल्यांमध्ये सक्षम बनवून त्यांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आहे.
या प्रशिक्षणामध्ये तरुणांच्या स्थानिक गरजा लक्षात घेऊन विविध क्षेत्रांमधील कोर्सेसचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये कृषी, बांधकाम, आयटी, पर्यटन व आदरातिथ्य, खाणकाम, वाहन उद्योग, ग्रीन जॉब्स, व्यवस्थापन आणि उद्योजकता, आरोग्य सेवा, वस्त्रोद्योग, मीडिया आणि मनोरंजन, फर्निचर अशा अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांचा समावेश आहे.
ज्या शासकीय संस्थांची नोंदणी आधीपासूनच एमएसएसडीएस पोर्टलवर आहे, त्यांना पुन्हा प्रस्ताव सादर करण्याची आवश्यकता नाही. मात्र, ज्या शासकीय संस्थांची नोंदणी नाही, त्यांनी ग्रीनचॅनलद्वारे या पोर्टलवर नोंदणी करणे बंधनकारक आहे.
त्याचप्रमाणे, इतर खाजगी आस्थापना, औद्योगिक आस्थापना आणि व्यवसाय प्रशिक्षण संस्थांना हे प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यासाठी स्किल इंडिया पोर्टलवर नोंदणी असणे आणि संबंधित कोर्सेससाठी मान्यता प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. या सर्व इच्छुक संस्थांनी आपले प्रस्ताव ८ सप्टेंबर २०२५ पर्यंत सादर करावेत.
या संदर्भात अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, बॅरेक क्र.२, शासकीय संकुल, गडचिरोली येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.