प्रेयसीची विहिरीत ढकलून हत्या करणाऱ्या प्रियकरास जिल्हा व सत्र न्यायालयाने दिली जन्मठेपेची शिक्षा.
गडचिरोली
प्रेयसीची विहिरीत ढकलून हत्या करणाऱ्या प्रियकरास गडचिरोली जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेप व 5 हजार रुपयांची दंडाची शिक्षा ठोठावली आहे. जयदेव निरंजन सरदार वय 22 रा.कोपरल्ली ता. मूलचेरा जि.गडचिरोली असे आरोपी प्रियकराचे नाव आहे.
11 जून 2020 रोजी आरोपी प्रियकर जयदेव सरकार आपल्या मित्रांसह पुल्लीगुडम चंदनवेली येथे गेला असता त्याने एका शेतात आपल्या प्रेयसीला बोलावले व तो प्रेयसीला घेऊन लगतच्या जंगलात गेला तिथे त्या दोघांमध्ये वाद झाला.आरोपी प्रियकर जयदेव ने प्रेयसीला जबर मारहाण करीत तिला विहिरीत ढकलून दिले यात तिचा मृत्यू झाला.
घटनेच्या दुसऱ्या दिवशी मृत मुलीचे वडील कोपरल्ली येथे जाण्यासाठी निघाले असता शेतातील विहिरी जवळ त्यांच्या मुलीच्या चपला आणि हातातील कडा दिसला.त्याचवेळी त्यांनी काही गावकऱ्यांना बोलावून मृत मुलीचा विहिरीतून मृतदेह बाहेर काढला.
त्यांनी या घटनेची तक्रार बोलेपल्ली पोलीस मदत केंद्रात केल्यानंतर पोलिसांनी घटनेचा छडा लावत आरोपी जयदेव सरकार यास अटक करून त्याच्यावर भांदवी 302 चा गुन्हा दाखल केला.
आज जिल्हा व सत्र न्यायालयाने साक्षीदारांचे बयाण व सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी जयदेव निरंजन सरकार यास जन्मठेप व 5 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.यात सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील अनिल प्रधान यांनी बाजू मांडली तर कोर्ट पैरवी म्हणून पोलीस निरीक्षक श्याम गव्हाणे उपनिरीक्षक नारायण बच्चलवार यांनी जबाबदारी सांभाळली.