गडचिरोलीत काॅंग्रेसला धक्का, भाजपची बाजू भक्कम
गडचिरोली वृत्तवानी न्यूज
गडचिरोली, ता. २२ : नगर परिषद निवडणुकीची मतदानाची तारीख जवळ येत असताना, राजकीय हालचालींना वेग येत असून शनिवार (ता. २२) युवक काॅंग्रेसचे प्रदेश महासचिव आणि सक्रिय पक्षनेते अतुल मल्लेलवार, अमित संगीडवार यांच्यासह इतर डझनभर नेते, पदाधिकारी आदींनी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे ऐन निवडणुकीत काॅंग्रेसला जबरदस्त धक्का बसून भाजपची बाजू मजबूत झाल्याचे दिसून येत आहे. राज्याचे महसूल मंत्री आणि ज्येष्ठ भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी या काँग्रेस नेत्यांना भाजपचा दुपट्टा व पुष्पगुच्छ देत त्यांचे पक्षात स्वागत केले.
सध्या, नगरपरिषद निवडणुकीचा रणसंग्राम शिगेला पोहोचला आहे. भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अॅड. प्रणोती सागर निंबोरकर आणि इतर सर्व २७ उमेदवारांच्या प्रचारासाठी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे शनिवारी गडचिरोलीत पोहोचले. शहरातील चामोर्शी रोडवरील भाजपच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन त्यांनी केले. या कार्यक्रमात भाजपला अधिक बळकटी मिळाल्याचे चित्र दिसत असून नगर परिषद निवडणुकीच्या मतदानापूर्वीच काँग्रेस पक्ष मागे पडल्याचे दिसून येत आहे. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बंडोपंत मल्लेलवार यांचे पुत्र आणि युवक काँग्रेसचे प्रदेश महासचिव तसेच अनेक वर्षे समर्पित भावनेने काँग्रेस पक्षाची सेवा करणारे नेते अतुल मल्लेलवार यांनी काँग्रेस पक्षाबद्दल नाराजी व्यक्त करत भाजपमध्ये प्रवेश केला. अमित संगीडवार आणि दहा वर्षांपासून पक्षात सामील झालेले इतर नेतेही भाजपमध्ये आले. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्व नवीन नेत्यांचे हार्दिक स्वागत केले. दरम्यान, निवडणुकीला फक्त १० दिवस शिल्लक असताना, मतदान आणि मतमोजणीपूर्वी निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश काँग्रेसला मोठा फटका देऊ शकतो, असे राजकीय जाणकार सांगत आहे. या घटनेमुळे अॅड. प्रणोती निंबोरकर व इतर नगरसेवक पदाच्या २७ उमेदवारांसह भाजप पक्षात उत्साह संचारला आहे.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले , ही निवडणूक विकासाची…
उद्घाटनानंतर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, ही निवडणूक विकासाची निवडणूक आहे. आम्ही या कार्यक्रमात जाहीरनामा प्रसिद्ध केला असून असा जाहीरनामा करण्याची क्षमता फक्त भाजपकडे आहे, कारण भाजप जे बोलतो तेच प्रत्यक्षात करतो. काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद वाढल्यामुळे अनेक नेते कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता भाजपच्या कार्यक्षमतेवर विश्वास ठेवून प्रवेश करत आहेत, हे आनंददायी आहे. गडचिरोलीत विकासासाठी १२५ योजना राबवायच्या असून १०० युनिटपर्यंत वीज वापरत असलेल्या नागरिकांना सूर्यघर योजना देणार असल्याचे ते म्हणाले. तसेच अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला जमिन पट्ट्याचा विषय लगेच मार्गी लावणार असल्याचेही त्यांनी सांगितले. माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोक नेते म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्जी फडणवीस यांचे गडचिरोली जिल्ह्यावर विशेष प्रेम आहे. गडचिरोली हा शेवटचा जिल्हा नसून विकासाच्या शर्यतीत अग्रेसर जिल्हा राहणार आहे. केंद्र व राज्यात भाजप सरकार असल्याने नगर परीषद भाजपच्या ताब्यात आल्यास अनेक मोठी विकासकामे वेगाने पूर्ण होतील. चिमूरचे आमदार व गडचिरोली जिल्हा निवडणूक प्रभारी बंटी उर्फ कीर्तिकुमार भांगडिया यांनी आगामी निवडणुकीत भाजप प्रचंड मताधिक्याने विजय मिळवेल, असा ठाम विश्वास व्यक्त केला. आमदार डाॅ. मिलिंद नरोटे यांनी देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यात देवेंद्र फडणवीस, गडचिरोली जिल्ह्यात मी नेतृत्व करत असून आता नगर परीषदेतही आमच्याच पक्षाचे नेतृत्व आल्यास विकास अधिक गतीने करता येईल असे सांगितले.
अॅड. प्रणोती सागर निंबोरकर यांचा संकल्प….
नगराध्यक्ष पदाच्या भाजपच्या अधिकृत उमेदवार अॅड. प्रणोती सागर निंबोरकर यांनी गडचिरोलीच्या विकासासाठी कटिबद्ध राहण्याची प्रतिज्ञा व्यक्त केली जनतेच्या आशीर्वादाने या निवडणुकीत प्रचंड मताधिक्याने विजय मिळवण्याचा संकल्प केला.
लाडक्या बहिणींची लक्षणीय उपस्थिती…
विशेष म्हणजे भाजप प्रचार कार्यालय उद्घाटन व कार्यकर्ता मेळाव्याप्रसंगी लाडक्या बहिणींची उपस्थिती मोठ्या संख्येने होती. कार्यक्रम सुरू होण्याच्या काही तास आधीच महिलांनी प्रचंड गर्दी केली होती. मागील निवडणुकीत लाडक्या बहिणींनीच विजयाचे नवे समीकरण निर्माण केले होते. येथेही लाडक्या बहिणींची साथ मिळेल, असा अंदाज राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.
———————————–





