गडचिरोली : भाजपमध्ये अंतर्गत भूकंप — जिल्हा महामंत्री गीता हिंगे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

605

गडचिरोली : भाजपमध्ये अंतर्गत भूकंप — जिल्हा महामंत्री गीता हिंगे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

 

– भाजपचा ‘खरा कार्यकर्ता’ उपेक्षित

– नाराजीतून राष्ट्रवादीकडे वाढते पाऊल

 

गडचिरोली : जिल्ह्यात इतर पक्षांत भूकंप घडविण्याची गर्जना करणाऱ्या भाजपमध्येच आता भूकंपांचे सत्र सुरु झाल्याचे स्पष्ट होत आहे. मागील २५ वर्षांपासून भारतीय जनता पक्षाची निष्ठा जपलेल्या गीता हिंगे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश केल्याने भाजपचे गणित अक्षरशः कोलमडले आहे. यापूर्वी भाजपचे जिल्हा महामंत्री रवी ओल्लालवार यांनीही पक्षत्याग करून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यामुळे भाजपात आता डबल भूकंप झाल्याची चर्चा जिल्ह्यात गती घेत आहे.

 

भाजपमध्ये खऱ्या कार्यकर्त्यांना मागे टाकून बाहेरून आणलेल्या धनाढ्य व संबंधवादी उमेदवारांना प्राधान्य दिले जात असल्याची नाराजी मोठ्या प्रमाणात उफाळून आली होती. नगराध्यक्ष पदासाठी योग्य हक्क असूनही गीता हिंगे यांना डावलण्यात आल्यामुळे त्यांच्यासह अनेक स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये असंतोष वाढत गेला.

 

भाजपचे काही वरिष्ठ नेते “इतर पक्षात फूट पाडू” असा इशारा देत होते; मात्र वास्तविकता मात्र उलट निघाली. भूकंप इतर पक्षांत नाही तर भाजपमध्येच झाला, अशी टीका राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे.

 

कार्यकर्त्यांची नाराजी, संघटनात्मक गटबाजी आणि स्थानिक नेतृत्वाच्या निर्णयांमधील विसंगती यामुळे भाजपचे पाऊल दुर्बल झाले असून नाराज कार्यकर्त्यांचा प्रवास राष्ट्रवादीकडे होत असल्याचे दृश्‍य स्पष्ट दिसत आहे.

 

गडचिरोली जिल्ह्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे बळ वाढत असून या राजकीय उलथापालथीचा परिणाम आगामी निवडणुकांमध्ये स्पष्टपणे उमटेल, असा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.