*जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा व पोलिस अधीक्षक निलोत्पल यांचेकडून नगरपरिषद निवडणूक व्यवस्थेची पाहणी*
*स्ट्राँग रुम आणि ईव्हीएम साठवणूक कक्षातील सुरक्षेचा घेतला आढावा*
गडचिरोली, दि. २६: आगामी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकांच्या अनुषंगाने, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा आणि जिल्हा पोलिस अधीक्षक श्री निलोत्पल यांनी आज निवडणूक व्यवस्थेची पाहणी केली. त्यांनी मतदान यंत्र सुरक्षा कक्षाला (स्ट्राँग रुम) आणि ईव्हीएम साठवणूक कक्षाला भेट देऊन तेथील सुरक्षा यंत्रणा आणि व्यवस्थेचा त्यांनी बारकाईने आढावा घेतला.
या दौऱ्यामध्ये जिल्हाधिकारी पंडा यांनी सर्वप्रथम कृषी महाविद्यालय येथील मतदान यंत्र सुरक्षा कक्षाला (स्ट्राँग रुम) भेट दिली. त्यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार स्ट्राँग रुममध्ये आवश्यक असलेल्या सर्व व्यवस्था, विशेषत: सीसीटीव्ही (CCTV) यंत्रणा, अग्नीरोधक यंत्रणा, तसेच डबल-लॉक सिस्टीम योग्य प्रकारे कार्यान्वित आहे की नाही, याची तपासणी केली. त्याचसोबत त्यांनी परिसरातील बाह्य सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करून सुरक्षेचा आढावा घेतला.
यानंतर जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी क्रांतीवीर बाबुराव शेडमाके शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील ईव्हीएम साठवणूक कक्षालाही भेट दिली. येथे त्यांनी सुरक्षा अलार्म, अग्निशामक यंत्रणा आणि पुरेसा विद्युत पुरवठा (दिवे) याची खात्री केली. याव्यतिरिक्त, मतमोजणीच्या दिवशी या परिसरात होणारी गर्दी प्रभावीपणे नियंत्रित करण्यासाठीच्या नियोजनावर त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली.
या पाहणी दरम्यान जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक यांचे समवेत अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक श्री गोकुल, गडचिरोली नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकारी स्मिता बेलपत्रे, व अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते.





