माजी मंत्री, आमदार डाॅ. धर्मरावबाबा आत्राम यांचा कॉर्नर सभांचा धडाका
गडचिरोली, ता. २९ : जिल्ह्यातील तिनही नगर परिषदांत आपले उमेदवार उभे करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाने प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात जोर लावणे सुरू केले आहे. पक्षाचे नेते आणि माजी मंत्री आमदार डाॅ. धर्मरावबाबा आत्राम मागील चार दिवसांपासून गडचिरोलीत ठाण मांडून आहेत. त्यांनी उमेदवारांसाठी कॉर्नर सभा घेत प्रचारात आघाडी घेतली आहे. जणू आपल्या प्रत्येक उमेदवाराला ‘भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे’, असेच सांगत आहेत.
गडचिरोली आणि देसाईगंजमध्ये शिवसेनेसोबत (शिंदे गट) युती करून तर आरमोरीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहे. निवडणुकीचे वातावरण तापत असताना राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना आपल्या पक्षात खेचून पक्षाची ताकद वाढवण्यासाठी जोर लावला. माजी नगराध्यक्ष तथा काॅंग्रेसचे नेते जेसा मोटवानी, अॅड. संजय गुरु, माजी जिल्हा परीषद अध्यक्ष रवींद्र ओल्लालवार, भाजपच्या जिल्हा महामंत्री गीता हिंगे, माजी जिल्हा परीषध सदस्य नीता साखरे अशा अनेकांनी राष्ट्रवादीची वाट धरली आहे. आता भाजप आणि राष्ट्रवादी-शिवसेना युती यांच्यातच खरी लढाई असल्याचे धर्मरावबाबा आत्राम सांगतात. आरमोरी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपदाचे उमेदवार जयकुमार मेश्राम यांनी आपला विकासाचा संकल्प व्यक्त करताना शहराच्या हद्दीतील जिल्हा परीषदेच्या १२ शाळा नगर परिषदेकडे घेऊन शैक्षणिक दर्जा उंचावण्याचा आणि शहरवासींना चांगले शिक्षण देण्याचा संकल्प केला आहे. त्यांच्यासाठी दिलीप मोटवानी व इतर पदाधिकारी मेहनत घेत आहेत. एकूणच जिल्ह्याच्या तिनही नगर परीषदांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काॅंग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे अस्तित्व प्रकर्षाने जाणवत आहे.
—————————————–




