५२ व्या ज्युनिअर राज्य कबड्डी स्पर्धेत अन्याय झाल्याचा गडचिरोलीतील खेळाडूंचा आरोप

290

५२ व्या ज्युनिअर राज्य कबड्डी स्पर्धेत अन्याय झाल्याचा गडचिरोलीतील खेळाडूंचा आरोप

वृत्तवानी गडचिरोली न्यूज,

गडचरोली,ता. १० : अकोला जिल्ह्यात नकत्याच पार पडलेल्या ५२ व्या ज्युनिअर राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत नियमबाह्य पद्धतीने खेळवून गडचिरोली जिल्ह्याच्या मुला-मुलींच्या संघाला हेतूपुरस्सर बाद केल्याचा गंभीर आरोप बुधवार (ता. १०) गडचिरोलीच्या कबड्डी खेळाडूंनी पत्रकार परिषदेत केला.. ही स्पर्धा अकोला जिल्ह्यातील केळावेळी येथे ५ ते ७ डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आली होती.

पत्रकार परीषदेत खेळाडून म्हणाले की, या स्पर्धेत मुलींच्या विभागात गडचिरोली संघाने ड-गटात अमरावती शहर, चंद्रपूर ग्रामीण आणि गोंदिया या संघांवर मात करून विजेतेपद पटकावले होते. नियमानुसार बाद फेरीत ड-गट विजेता विरुद्ध अ-गट उपविजेता असा सामना होणे आवश्यक असताना, स्पर्धा समितीने नियम बदलून गडचिरोलीचा सामना अ-गट विजेता नागपूर शहराशी लावला. याबाबत विशिष्ट संघाला चाल देण्यात आल्याचा दावा करत संताप व्यक्त करण्यात आला. याचवेळी अ-गटातील दोन्ही सामने हरलेले अकोला ग्रामीण विरुद्ध उपविजेता अमरावती शहर असा सामना घेण्यात आल्याने स्पर्धेची पारदर्शकता धोक्यात आली असल्याचेही सांगण्यात आले. तसेच मुलांच्या विभागात केवळ पाच-पाच मिनिटांचे सामने घेऊन अमरावती ग्रामीण व अमरावती शहर यांना पुढे चाल देण्यात आली, तर गडचिरोलीच्या संघाला राष्ट्रीय स्तरावर जाण्यापासून वंचित ठेवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. यापूर्वी बल्लारपूर-अकोला येथील अजिंक्यपद स्पर्धेतही याच प्रकारे दबाव टाकून नियमबाह्य सामने घेतल्याची तक्रार गडचिरोलीच्या अधिकाऱ्यांनी नोंदवली होती. केळावेळी येथे सामने सुरू असताना निवड समिती सदस्य विनायक माळी यांनी कोच व मॅनेजरवर अमरावतीला पुढे चाल देण्याचा दबाव टाकल्याचेही पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. भाग्यपत्रकानुसार सामने घेतले असते तर गडचिरोलीचे संघ विजयी ठरले असते, असा दावा करण्यात आला. स्पर्धा निरक्षकांशी चर्चा केल्यावर त्यांनी’ आम्हाला वरून ज्या सूचना येतात त्यानुसार सामने घेतो, आम्ही काही करू शकत नाही.’ असे स्पष्ट केले. या प्रकारामुळे गडचिरोली जिल्ह्यातील खेळाडू आणि त्यांच्या पालकांमध्ये तीव्र संतापाची लाट असून, प्रकरण पोलिस विभागाकडे देऊन न्याय प्रवीष्ट करण्याची तयारी सुरु असल्याचेही सांगण्यात आले. खेळाडू मानसिक ताणात असून, त्यांच्याकडून काही अनैतिक कृती घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी स्पर्धा समितीवर राहील, असा इशाराही देण्यात आला. या अन्यायाबाबतचा सविस्तर अहवाल गडचिरोली जिल्ह्याचे आमदार, पालकमंत्री तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याच्या क्रीड मंत्र्यांना सादर करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. पत्रकार परिषदेला आशीष विश्वास, देवयानी निसार, तृणल पुडो, वैभव नरोटे, आकाश नंदावार, प्रशांत कोटगले, चंदन कांबळे, पीयूष चिचघरे, रोहित कल्लो, आदित्य दोडके, मोहित मेश्राम, निलेश कावळे, भावेश भोयर, आर्यन सालोरकर, रिया किचाकी, प्रलव तुलावी, रक्षा मेश्राम, जयश्री उईंनवार, विद्या राणा, प्रगती गेडाम, ज्ञानेश्वरी गंडाटे, कल्याणी विनायके, नागेश्वर मल्लेवार, अपेक्षा आरेवार, गीतांजली चौधरी, सायली भांडवले, सपना बांगरे, समीक्षा सहारे, खुशबू नैताम, अगस्ती रोडे, अजय कावळे, ज्ञानेश्वर कारकाडे, कार्तिक जमाने, रोहेल गुरुनुले, कुणाल देशमुख, पवन भोयर, साहिल जराते, नयन राऊत आणि सुरेंद्र उसेंडी उपस्थित होते.