*गोसेखुर्द उजव्या कालव्याच्या पाण्यासाठी महिला शेतकऱ्यांचे आमरण उपोषण*_

61

_*गोसेखुर्द उजव्या कालव्याच्या पाण्यासाठी महिला शेतकऱ्यांचे आमरण उपोषण*_

 

_*माजी जि. प. सदस्य प्रमोद चिमूरकर यांची उपोषणस्थळी भेट*_

 

ब्रह्मपुरी | प्रतिनिधी

_गोसेखुर्द प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचे पाणी उन्हाळी हंगामात धान पिकाला नियमित मिळावे, या मागणीसाठी सायगाटा येथील गोसेखुर्द उजवा कालवा विभाग कार्यालयासमोर महिला शेतकऱ्यांनी १५ डिसेंबर २०२५ पासून आमरण उपोषण आंदोलन सुरू केले आहे. *या उपोषणस्थळी आज दिनांक १६ डिसेंबर रोजी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद चिमूरकर यांनी भेट देत उपोषणकर्त्यांशी सविस्तर संवाद साधला.*_

_गेल्या दोन वर्षांपासून उन्हाळी धान पिकाला पाणी मिळावे यासाठी शेतकरी सातत्याने निवेदनांद्वारे पाठपुरावा करत आहेत. मात्र संबंधित विभागाकडून ठोस निर्णय न घेता केवळ बनवाबनवीची उत्तरे दिली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. अस्मानी–सुलतानी संकटांनी त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांसमोर आता आमरण उपोषणाशिवाय पर्याय उरला नसल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे. उपोषणस्थळी उपस्थित महिलांशी सुमारे दोन तास चर्चा करत प्रमोद चिमूरकर यांनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी गोसेखुर्द प्रकल्पाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी मोबाईलवरून थेट संपर्क साधत शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी केली. तसेच उपोषणकर्त्यांमध्ये अनेक महिला शेतकरी असल्याने त्यांच्या आरोग्याची योग्य ती काळजी घेण्याचे स्पष्ट निर्देशही दिले._

_यासोबतच ब्रह्मपुरी ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांशी संपर्क साधून उपोषणकर्त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. भविष्यात उपोषणकर्त्यांच्या बाबतीत कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी गोसेखुर्द प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांवर राहील, असे स्पष्ट मत माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद चिमूरकर यांनी व्यक्त केले._

_या विषयासंदर्भात यापूर्वीही या क्षेत्राचे आमदार तथा काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सक्रिय भूमिका घेतली होती. गोसेखुर्द प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचे पाणी शेतकऱ्यांना मिळावे यासाठी त्यांनी कार्यकारी अभियंता संदीप हासे यांच्याशी थेट चर्चा करून पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांमुळे पावसाळी हंगामात शेतकऱ्यांना धान पिकासाठी पाणी उपलब्ध झाले होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर नेहमीच संवेदनशील भूमिका घेणारे आमदार विजय वडेट्टीवार हे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नेहमी धावून येतात, यापूर्वी गोसेखुर्द प्रकल्पाच्या कालव्यांना मोठ्या प्रमाणात क्षती पोहोचली असताना, त्या दुरुस्तीचा प्रश्न त्यांनी शासनदरबारी सातत्याने लावून धरला होता. अखेर संबंधित कामे पूर्ण करून शेतकऱ्यांना पुन्हा पाणी उपलब्ध करून देण्यात आले होते. अशी माहिती प्रमोद चिमूरकर यांनी यावेळी उपोषणकर्त्यांना दिली._

_दरम्यान, या आमरण उपोषणाला नागभीड व ब्रह्मपुरी तालुक्यातून मोठा प्रतिसाद मिळत असून विविध राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांनीही आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. *“काळजी करू नका, मी तुमच्या सोबत आहे,” असा विश्वास देत प्रमोद चिमूरकर यांनी शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहील, असे आश्वासन दिले आहे.*_