*नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा–२ शेतकऱ्यांच्या सामाजिक-आर्थिक परिवर्तनासाठी महत्त्वाचा – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा*
*मृदासंधारण, जलसंधारण व मायक्रो लेव्हल प्लॅनिंगवर भर*
गडचिरोली, (जिमाका) दि. १७ :
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (टप्पा–२) हा शेतकऱ्यांच्या केवळ कृषी उत्पादनवाढीसाठी नसून त्यांच्या संपूर्ण सामाजिक-आर्थिक परिवर्तनासाठी महत्त्वाचा ठरणारा प्रकल्प आहे. या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर मृदासंधारण व जलसंधारणाची कामे राबवून भूजल पातळी वाढविता येईल तसेच दुबार पीक घेण्यास चालना मिळेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा आढावा
जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली काल जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आला. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रिती हिरळकर, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रशांत ढोंगले, कृषी विकास अधिकारी किरण खोमणे, आत्मा च्या समन्वयक अर्चना कोचरे व संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.
शेतकऱ्यांनी स्वयंप्रेरणेने व हिरीरीने मायक्रो लेव्हल प्लॅनिंगमध्ये सहभाग घेऊन आपल्या गावाच्या व शेताच्या गरजेनुसार कामांची मागणी करावी, असे आवाहनही श्री पंडा यांनी केले. नैसर्गिक संसाधन व्यवस्थापनाच्या माध्यमातून जिल्ह्यात अधिकाधिक मृदासंधारणाची कामे करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी जिल्हाधिकारी पंडा यांनी मत्स्य तळ्यांच्या व्यवस्थापनाबाबतही सविस्तर चर्चा केली. तलावांमधील गाळ काढल्यास पाणी साठवण क्षमता वाढून मत्स्य उत्पादनात लक्षणीय वाढ होऊ शकते, त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक आर्थिक लाभ मिळेल, असे त्यांनी नमूद केले. मामा तलावासारख्या तलावांबाबत तांत्रिक दृष्ट्या नियोजन करून कामे हाती घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
या योजनेकडे केवळ कृषी विभागानेच नव्हे तर इतर विभाग तसेच जिल्हा परिषद विभागांनीही गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. गडचिरोली जिल्ह्याचा सीएफआर (कम्युनिटी फॉरेस्ट राईट्स) दर्जा चांगला असून योग्य नियोजन व समन्वयातून या माध्यमातून आणखी प्रभावी काम करता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. यासाठी या विषयावर लक्ष केंद्रीत करून स्वतंत्र बैठका आयोजित करण्याच्या सूचना त्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना दिल्या.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (टप्पा–२) अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील सूक्ष्म नियोजन आराखड्यांना मान्यता देण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची सभा दि. १६ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेस कृषी विभागासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
यानंतर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर यांनी प्रकल्पाची सविस्तर माहिती सादर केली. त्यांनी सांगितले की, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा–२ अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात एकूण ५३२ गावे समाविष्ट असून सध्या १२४ गावांचे सूक्ष्म नियोजन आराखडे जिल्हास्तरावर प्राप्त झाले आहेत. हे आराखडे गावातील सरपंच व कृषी सहाय्यकांच्या मदतीने पीआरए पद्धतीचा अवलंब करून गावाच्या गरजा व उपलब्ध संसाधनांचा विचार करून तयार करण्यात आले आहेत.
जिल्ह्यात या प्रकल्पासाठी विविध स्तरांवर मनुष्यबळ कार्यरत असून सध्या ४६० कृषी ताई, १८५५ स्वयंसेवक, २४ समूह सहाय्यक व २०४ सरपंच या प्रकल्पाच्या अंमलबजावणीत सहभागी आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.
या प्रकल्पांतर्गत वैयक्तिक लाभ, शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी सुविधा तसेच नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन अशी प्रमुख क्षेत्रे असून वैयक्तिक लाभांतर्गत १७ प्रकारच्या योजना राबविण्यात येतात. यामध्ये भूमिहीन शेतमजुरांनाही शेळीपालनासारख्या उपक्रमांच्या माध्यमातून लाभ मिळतो. तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी गावस्तरावर कृषी अवजारे बँक व कृषी माल साठवणीसाठी नवीन गोदामांची सुविधा देण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नैसर्गिक संसाधन व्यवस्थापनांतर्गत मृदासंधारण, जलसंधारण, शेततळे, विहीर पुनर्भरण तसेच जुन्या जलसाठ्यांचे पुनरुजीवन यांसारख्या विविध कामांचा लाभ शेतकऱ्यांना घेता येतो, असेही त्यांनी सांगितले.
एकूणच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (टप्पा–२) च्या प्रभावी अंमलबजावणीद्वारे गडचिरोली जिल्ह्यात शाश्वत कृषी विकासासह शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यास मोठी संधी असून शेतकरी व सर्व संबंधित विभागांनी या योजनेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले.




