*परसबाग ढेकणी येथे उमेद मार्फत दशपर्णी अर्क निर्मिती उपक्रम*
ढेकणी, जि. गडचिरोली : जि.प.प्राथमिक शाळा ढेकणी येथे माझी शाळा-माझे उपक्रम अंतर्गत परसबाग विकासाला चालना देण्यासाठी उमेद मार्फत दशपर्णी अर्क निर्मितीचा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला. या उपक्रमाचा मुख्य उद्देश परसबागेतील भाजीपाला व इतर पिकांवर रासायनिक औषधांऐवजी सेंद्रिय व पर्यावरणपूरक उपायांचा अवलंब करून कीड व रोग नियंत्रण करणे हा होता.
या कार्यक्रमास विनोद कोंदामी (अध्यक्ष, शेतकरी गट, मुतनूर), काजल नरोटे (ICRP), वनिता किरंगे (ICRP, उमेद पावीमुरांडा), वनिता मट्टामी, निरुता कुमोटी, मनीषा कुमोटी (बचत गट पदाधिकारी, ढेकणी), मादगनबाई सुरजागडे, सुमित्रा कुमोटी (अंगणवाडी सेविका) यांच्यासह शालेय विद्यार्थी व मुख्याध्यापक राजेश्वर मुलकलवार उपस्थित होते.
यावेळी दशपर्णी अर्क तयार करताना कडुनिंब, करंज, सीताफळ, पेरू, पपई, एरंड, धोतरा, रुई, बेशरम, घाणेरी, लाल कण्हेर, गुडवेल, आवळा तसेच तुळस अशा विविध औषधी व कीटकनाशक गुणधर्म असलेल्या झाडांच्या पानांचा वापर करण्यात आला. या अर्कामध्ये गोमूत्र, शेण, गूळ व पाणी यांचा समावेश करून नैसर्गिक पद्धतीने अर्क तयार करण्याची प्रत्यक्ष प्रात्यक्षिके देण्यात आली.
दशपर्णी अर्काचा उपयोग भाजीपाला व फळपिकांवरील कीड, रोग व बुरशी नियंत्रणास प्रभावी ठरत असून मानवी आरोग्य व पर्यावरणासाठी सुरक्षित असल्याचे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले. महिलांचा व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला असून सेंद्रिय शेती, स्वयंपूर्णता व पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने हा उपक्रम प्रेरणादायी ठरला. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक राजेश्वर मुलकलवार यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.




