गडचिरोली भाजप नगराध्यक्षपदी प्रणोती निंबोरकर यांचा ऐतिहासिक विजय
दिं 21/12/2025
गडचिरोली : गडचिरोली शहराच्या राजकारणात नवा अध्याय सुरू झाला असून, भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रणोती सागर निंबोरकर यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. शहरातील नागरिक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर प्रचंड विश्वास टाकत विजयाचा कौल दिला आहे.
हा विजय केवळ व्यक्तीचा नसून, तो नव्या चेहऱ्याचा, नव्या विचारांचा आणि विकासाच्या नव्या संकल्पाचा विजय मानला जात आहे. स्वच्छ प्रशासन, पारदर्शक कारभार आणि सर्वसमावेशक विकास ही भूमिका मांडत प्रणोती निंबोरकर यांनी जनतेशी थेट संवाद साधला, ज्याला शहरवासीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
निवडणूक काळात भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकसंघपणे मेहनत घेतली. घराघरांत पोहोचलेला प्रचार, विकासाचा स्पष्ट रोडमॅप आणि संघटनात्मक ताकदीच्या जोरावर हा विजय साकार झाला.
विजयानंतर बोलताना प्रणोती सागर निंबोरकर यांनी शहरातील नागरिकांचे आभार मानत,
“गडचिरोलीच्या सर्वांगीण विकासासाठी, प्रत्येक घटकाला सोबत घेऊन काम करण्याचा निर्धार मी केला आहे,” असे ठामपणे सांगितले.
या निकालामुळे गडचिरोली शहरात भाजपची ताकद अधिक मजबूत झाली असून, विकासाचा नवा संकल्प प्रत्यक्षात उतरवण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.




