Home Breaking News *सोमलपूर येथे सुवर्ण महोत्सवी युवा क्रीडा मंडळाच्या वतीने कबड्डी व व्हॉलीबॉल स्पर्धेचे...

*सोमलपूर येथे सुवर्ण महोत्सवी युवा क्रीडा मंडळाच्या वतीने कबड्डी व व्हॉलीबॉल स्पर्धेचे भव्य उद्घाटन*

109

*सोमलपूर येथे सुवर्ण महोत्सवी युवा क्रीडा मंडळाच्या वतीने कबड्डी व व्हॉलीबॉल स्पर्धेचे भव्य उद्घाटन*

*माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते क्रीडा महोत्सवाला प्रारंभ*

पेंढरी :- गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या, डोंगर–जंगलाच्या कुशीत नटलेल्या नयनरम्य सोमलपूर गावात सुवर्ण महोत्सवी युवा क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित कबड्डी व व्हॉलीबॉल स्पर्धेचे भव्य उद्घाटन माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.

डोंगररांगांनी वेढलेल्या, हिरवळीच्या सान्निध्यात पार पडलेल्या या क्रीडा स्पर्धेने सोमलपूरच्या नैसर्गिक सौंदर्याला अधिकच उठाव दिला. खेळाच्या माध्यमातून गावात उसळलेला उत्साह, युवकांची प्रचंड उपस्थिती आणि क्रीडाप्रती असलेली निष्ठा पाहून माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी विशेष आनंद व्यक्त केला.

खेळ हीच गावाच्या विकासाची खरी दिशा – डॉ. होळी

उद्घाटनप्रसंगी बोलताना डॉ. देवराव होळी म्हणाले की,

“खेळामुळे केवळ शरीर सुदृढ राहत नाही, तर शिस्त, संघभावना, नेतृत्वगुण आणि संघर्ष करण्याची ताकद निर्माण होते. सोमलपूरसारख्या दुर्गम भागात क्रीडासंस्कृती जपली जाते, ही बाब अत्यंत अभिमानास्पद आहे. खेळाडूंनी मैदानात जसा जिद्दीनं खेळ करावा, तसाच गावाच्या सर्वांगीण विकासासाठीही पुढाकार घ्यावा.”

तसेच त्यांनी युवकांना व्यसनांपासून दूर राहून खेळ, शिक्षण आणि सामाजिक बांधिलकी यावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले. गावाच्या विकासासाठी एकजूट, सकारात्मक विचार आणि सातत्य आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

सोमलपूरवासीयांची खेळांप्रती असलेली आवड ठरली आकर्षण

सोमलपूर गावातील नागरिकांची खेळांप्रती असलेली आपुलकी, युवकांचा उत्स्फूर्त सहभाग आणि सुवर्ण महोत्सवी युवा क्रीडा मंडळाचे नियोजन पाहून डॉ. होळी विशेष प्रभावित झाले. “डोंगर-जंगलात वसलेल्या या भागातही खेळाला दिले जाणारे महत्त्व प्रेरणादायी आहे,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

*खेळाडू व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*

या स्पर्धेत परिसरातील विविध गावांतील संघांनी सहभाग नोंदवला आहे. कबड्डी व व्हॉलीबॉल सामन्यांमुळे संपूर्ण परिसरात क्रीडामय वातावरण निर्माण झाले असून, युवक-युवतींसह ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.

या उद्घाटनप्रसंगी कृऊबा संचालक हेमंत बोरकुटे, दुर्गापूर चे सरपंच परमेश्वर गावडे, पेंढरी च्या उपसरपंच लक्ष्मी आतला, भूपेंद्र नाईक, मुख्याध्यापक विजय मेश्राम, मुख्याध्यापक भगिन्द्र पवार, अंगणवाडी सेविका शारदा मेश्राम, दुर्गापूर च्या उपसरपंच सिंधू पोटावी, ग्रामसेवक दिवाकर रामटेके केशव आतला, माजी उपसरपंच दुर्गापूर चे छबीलाल बसेरा, मदन करंगामी आदी मान्यवर उपस्थित होते.

क्रीडेतून विकासाकडे वाटचाल

सोमलपूरसारख्या दुर्गम भागात अशा स्पर्धांचे आयोजन केल्याने युवकांना नवी दिशा मिळत असून, गावाच्या सामाजिक व सांस्कृतिक विकासाला चालना मिळत आहे. खेळाच्या माध्यमातून एकात्मता, आरोग्य आणि नेतृत्वगुण जोपासले जात असल्याचे वक्तव्य कृऊबा संचालक हेमंत बोरकुटे यांनी केले.

स्पर्धेच्या यशस्वीते करिता क्रीडा मंडळाचे अध्यक्ष मेहरसिंग गावडे, उपाध्यक्ष मिदुल मंडल, सचिव नामदेव गावडे, सहसचिव बारसिंग गावडे, सुनील आतला, क्रीडा प्रमुख गणेश पोटावी, उमेश गावडे, उपक्रीडा प्रमुख सीताराम हलमी, सीताराम नरोटे सदस्य शांताराम पोटावी, रजेनसिंग पोटावी, काशीराम हलामी, सुरेश गावडे, परशुराम पोटावी, सखाराम गावडे, मंगलदास आतला, संजय गावडे आदी पदाधिकारी, ग्रामस्थ, खेळाडू, युवक-युवती तसेच परिसरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Don`t copy text!