Home Breaking News ज्ञानदानाच्या अखंड सेवेला मानाचा मुजरा! जिल्हा सरचिटणीस अशोक रायसिडाम (महाराज) यांचा...

ज्ञानदानाच्या अखंड सेवेला मानाचा मुजरा! जिल्हा सरचिटणीस अशोक रायसिडाम (महाराज) यांचा सेवानिवृत्ती सत्कार व वाढदिवस सोहळा उत्साहात संपन्न

9

 

ज्ञानदानाच्या अखंड सेवेला मानाचा मुजरा!

जिल्हा सरचिटणीस अशोक रायसिडाम (महाराज) यांचा सेवानिवृत्ती सत्कार व वाढदिवस सोहळा उत्साहात संपन्न

शिक्षक, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांची मोठी उपस्थिती

चामोर्शी (प्रतिनिधी) :

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, जिल्हा गडचिरोलीचे जिल्हा सरचिटणीस तथा शिक्षक चळवळीतील झुंजार नेतृत्व म्हणून ओळख असलेले अशोक प्रतापराव रायसिडाम (महाराज) यांच्या सेवानिवृत्ती निमित्त आयोजित सत्कार समारंभ आणि वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा राजवाडा, पावीमुरांडा येथे मोठ्या उत्साहात आणि दिमाखदार वातावरणात पार पडला.

सुमारे ५८ वर्षांपर्यंत शिक्षण क्षेत्रात ज्ञानदानाचे पवित्र कार्य बजावत प्रभारी मुख्याध्यापक पदावरून सेवानिवृत्त झालेल्या रायसिडाम सरांनी आपल्या कार्यकाळात शैक्षणिक, सामाजिक तसेच शिक्षक संघटनात्मक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले. त्यांच्या कार्यामुळे शिक्षक संघटनेला बळकटी मिळाली असून अनेक शिक्षकांना त्यांनी प्रेरणा दिली आहे.

या प्रसंगी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, जिल्हा गडचिरोलीच्या वतीने रायसिडाम सर व त्यांच्या धर्मपत्नींचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, साडी-चोळी व स्मृतिचिन्ह देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत पुढील आयुष्य सुखी, समाधानी, निरोगी व आनंदमय जावो, अशा शुभेच्छा व्यक्त केल्या.

कार्यक्रमात शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रघुनाथ भांडेकर, जिल्हा सल्लागार राजेश कोतावार, जनार्दन म्हशाखेत्री, दामोधर बामनवाडे, ओमप्रकाश झाडे, जिल्हा कोषाध्यक्ष राजेश चिलमवार, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश वासलवार, किशोर आत्राम, प्रसिद्धीप्रमुख भुजंगराव नारनवरे यांच्यासह विविध तालुक्यांतील पदाधिकारी, केंद्रप्रमुख, सेवानिवृत्त शिक्षक, शिक्षक पतसंस्थेचे संचालक तसेच शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उपस्थित वक्त्यांनी रायसिडाम सरांच्या संघटन कौशल्याचा, नेतृत्वगुणांचा आणि शिक्षकांच्या प्रश्नांसाठी केलेल्या सातत्यपूर्ण लढ्याचा विशेष उल्लेख केला. शिक्षक संघटनेच्या बळकटीकरणासाठी त्यांनी दिलेले योगदान भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाला जिल्हाभरातील शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनांचे पदाधिकारी, रायसिडाम सरांचे आप्तेष्ट, नातेवाईक व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्नेह, आदर आणि कृतज्ञतेच्या वातावरणात पार पडलेला हा सोहळा उपस्थितांच्या कायम स्मरणात राहणारा ठरला.

 

Don`t copy text!