*राष्ट्रीय खाद्य तेल अभियानांतर्गत वैयक्तिक शेतकऱ्यांनाही मिळणार अर्थसहाय्य*
*काढणी पश्चात पायाभूत सुविधा घटकाचा लाभ वैयक्तिक लाभार्थ्यांसाठी खुला*
गडचिरोली, (जिमाका) दि. ०९ :
केंद्र शासनाच्या राष्ट्रीय खाद्य तेल अभियान – तेलबिया, अंतर्गत सन २०२५–२६ साठी राबविण्यात येणाऱ्या काढणी पश्चात पायाभूत सुविधा सहाय्य या महत्त्वपूर्ण घटकाचा लाभ आता केवळ शासकीय व खाजगी उद्योग, शेतकरी उत्पादक संस्था (FPOs) आणि सहकारी संस्थांपुरता मर्यादित न राहता वैयक्तिक शेतकऱ्यांनाही देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
याबाबत दिनांक ७ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या केंद्र शासनाच्या आढावा बैठकीत सविस्तर चर्चा करून, सदर घटकांतर्गत इतर पात्र वैयक्तिक शेतकऱ्यांनाही अर्थसहाय्य देता येईल, असे स्पष्ट करण्यात आले. त्यानुसार, अभियानाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार निश्चित केलेल्या भौतिक व आर्थिक लक्षांकांच्या मर्यादेत राहून आता शासकीय/खाजगी उद्योग, शेतकरी उत्पादक संस्था, सहकारी संस्था यांच्यासह वैयक्तिक लाभार्थ्यांनाही सहाय्य दिले जाणार आहे.
*तेलबिया प्रक्रियेला चालना देण्याचा उद्देश*
गडचिरोली जिल्ह्यात तेलबियांच्या संकलन, तेल निष्कर्षण व पुनर्प्राप्ती प्रक्रियेत कार्यक्षमतेत वाढ व्हावी, तसेच स्थानिक पातळीवर मूल्यवर्धन घडून यावे, या उद्देशाने काढणी पश्चात पायाभूत सुविधा उभारणीसाठी शासनामार्फत सहाय्य दिले जाणार आहे. यामध्ये विशेषतः तेलघानी, तेल निष्कर्षण युनिट्स व तेलबिया प्रक्रिया संबंधित यंत्रसामग्रीचा समावेश आहे.
*अर्ज प्रक्रिया व निवड पद्धत*
या घटकांतर्गत अर्ज स्वीकारताना प्रथम अर्जास प्रथम प्राधान्य या तत्त्वाचा अवलंब केला जाणार आहे. तेलबिया व मोहरी संचालनालयामार्फत प्राप्त प्रस्तावांचे परीक्षण करण्यात येईल. निवड झालेल्या प्रकल्पांना राज्य कृती आराखड्यांमार्फत आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मात्र, जमीन व इमारत खर्चासाठी कोणतेही सहाय्य दिले जाणार नाही आणि हे खर्च प्रकल्प खर्चात ग्राह्य धरले जाणार नाहीत.
तेलघानी निष्कर्षण युनिटसाठी लागणाऱ्या यंत्रसामग्री व उपकरणे तसेच तेलबिया प्रक्रिया प्रकल्पासाठी
प्रकल्प खर्चाच्या ३३ टक्के किंवा कमाल रुपये ९.९० लाख प्रति प्रकल्प इतके अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील पात्र व इच्छुक वैयक्तिक शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या व संस्था यांनी या घटकाचा लाभ घेण्यासाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेचे पूर्णतः पालन करून या योजनेचा व्यापक प्रचार-प्रसार करण्यात येत असून, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रिती हिरळकर यांनी केले आहे.
0000






