Home Breaking News लांझेडा येथिल राजू वखरे यांच्या घराला भीषण आग; लाखो रूपयाचे नुकसान!

लांझेडा येथिल राजू वखरे यांच्या घराला भीषण आग; लाखो रूपयाचे नुकसान!

51

लांझेडा येथिल राजू वखरे यांच्या घराला भीषण आग; लाखो रूपयाचे नुकसान!

 

घरातील संपूर्ण संसार जळून खाक; सुदैवाने जीवितहानी टळली

 

गडचिरोली :गडचिरोलीतील लांझेडा वार्डात महादेव मंदिराजवळ असलेल्या राजू वखरे यांच्या घरी मंगळवार, १३ जानेवारी रोजी सकाळी सुमारे ९ वाजताच्या सुमारास फ्रिजमधील शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत घरातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

 

या कुटुंबातील मिना वखरे या कारवाफा प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सहायिका म्हणून कार्यरत आहेत. घटनेच्या वेळी त्यांचे पती राजू वखरे त्यांना कारवाफा येथे सोडण्यासाठी गेले होते. घरात त्यांची तीन मुली होत्या. सकाळची घरकामे आटोपून ती वरच्या मजल्यावरील खोलीत अभ्यास करत होती.

 

अचानक तळमजल्यावरून धूर येताना व जळल्याचा तीव्र वास येऊ लागल्याने मुलींनी खाली येऊन पाहिले असता खोलीत आग लागलेली दिसून आली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येताच त्यांनी मोठ्या धैर्याने कसेबसे घराबाहेर पडत आरडाओरड सुरू केली. त्यांच्या आवाजाने आजूबाजूचे नागरिक तात्काळ घटनास्थळी धावले.

 

अग्निशामक दलाला त्वरित माहिती देण्यात आली; मात्र रस्ता अरुंद असल्यामुळे अग्निशामक वाहन घरापर्यंत पोहोचू शकले नाही. स्थानिक नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, परंतु तोपर्यंत आग प्रचंड भडकली होती.

 

या आगीत फ्रिज, टीव्ही, आरओ मशीन, मोबाईल, कपाट, गॅस शेगडी, संपूर्ण कपडे, भांडी, फॅन, मिक्सर, सुमारे ८० हजार रुपये रोख रक्कम, दागिने, शाळेची व नोकरीची कागदपत्रे, जागेचे महत्त्वाचे दस्तऐवज यासह घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे.

 

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र वखरे कुटुंब अक्षरशः उघड्यावर आले असून त्यांच्यावर मोठे संकट कोसळले आहे. घटनेची नोंद गडचिरोली पोलीस स्टेशनमध्ये तोंडी तक्रारीद्वारे करण्यात आली आहे.

 

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून प्रशासनाने वखरे कुटुंबाला तातडीची मदत द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Don`t copy text!