*जेईई परीक्षा केंद्र परिसरात २०० मीटरपर्यंत मनाई आदेश*
गडचिरोली, (जिमाका) दि. १५ :
राष्ट्रीय परीक्षा संस्था, नवी दिल्ली यांच्या वतीने घेण्यात येणारी संयुक्त प्रवेश परीक्षा (जेईई मेन) २०२६ ही संगणक आधारित परीक्षा गडचिरोली येथील शासकीय विज्ञान महाविद्यालय, चामोर्शी रोड येथे आयोजित करण्यात आली आहे. ही परीक्षा दिनांक २१, २२, २३, २४ व २८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी १२.०० या कालावधीत (सकाळ सत्र) तसेच दुपारी ३.०० ते सायंकाळी ६.०० या वेळेत (दुपार सत्र) घेण्यात येणार आहे. तसेच दिनांक २९ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी १२.३० या कालावधीत परीक्षा होणार आहे.
सदर परीक्षा शांत, सुरक्षित व तणावमुक्त वातावरणात पार पडावी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ मधील कलम १६३ अन्वये परीक्षा केंद्राच्या २०० मीटर परिसरात मनाई आदेश जारी केला आहे.
या आदेशानुसार, निषिद्ध क्षेत्रात परीक्षा कालावधीत छायांकित प्रत काढण्याचे यंत्र, दूरलेख यंत्र तसेच सार्वजनिक दूरध्वनी केंद्रे सुरू ठेवण्यास मनाई करण्यात आली आहे. परीक्षा केंद्र व त्याच्या परिसरात भ्रमणध्वनी, संगणक, पेजर, ध्वनिमुद्रक, छायाचित्रण यंत्र आदी कोणत्याही प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर करता येणार नाही.
तसेच निषिद्ध क्षेत्रात नारेबाजी करणे, घोषणा देणे, भाषणे करणे, गाणी म्हणणे किंवा वाद्य वाजविणे प्रतिबंधित राहील. पाचपेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येण्यास मनाई असून कोणत्याही प्रकारची शस्त्रे, काठ्या, लाठ्या, सोटे, तलवारी, भाले, बंदुका, सुरे किंवा शारीरिक इजा होऊ शकतील अशा वस्तू बाळगण्यास बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय दाहक किंवा स्फोटक पदार्थ बाळगण्यासही सक्त मनाई करण्यात आली आहे.
हा आदेश कर्तव्यावर असलेले वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी व कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तैनात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना लागू राहणार नाही.
सदर अधिसूचनेतील कोणत्याही अटीचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध फौजदारी कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे. हा मनाई आदेश परीक्षेच्या दिवशी सकाळी ७.०० वाजेपासून रात्री ८.०० वाजेपर्यंत अमलात राहील, अशी माहिती जिल्हादंडाधिकारी श्री. अविश्यांत पंडा यांनी दिली आहे.
0000






