*पुस्कोटी येथे भव्य ग्रामीण व्हॉलीबॉल व कबड्डी स्पर्धा उत्साहात संपन्न*
जय क्रीडा मंडळ, पुस्कोटी यांच्या सौजन्याने भव्य ग्रामीण व्हॉलीबॉल व कबड्डी स्पर्धा आदिवासी बहुल परिसरात उत्साहात पार पडल्या. दिनांक १५ जानेवारी २०२५ रोजी पुस्कोटी येथे या स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या स्पर्धांमुळे आदिवासी भागातील युवक-युवतींमध्ये खेळाची आवड वाढीस लागून ग्रामीण क्रीडाप्रतिभांना आपली गुणवत्ता दाखवण्याचे व्यासपीठ मिळाले. कबड्डी स्पर्धेत जांभीया संघाने प्रथम क्रमांक, तर पुस्कोटी संघाने द्वितीय क्रमांक पटकावला. व्हॉलीबॉल स्पर्धेत पोयारकोठी संघाने प्रथम क्रमांक मिळवून विजेतेपद पटकावले.
बक्षीस वितरण कार्यक्रमाला मा. सैनुजी गोटा (संचालक, आदिवासी विकास महामंडळ, नाशिक) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी कॉ. सचिन मोतकुरवार (जिल्हा सहसचिव, Communist Party of India), कॉ. सुरज जक्कुलवार (जिल्हा कार्यकारिणी सदस्य), कॉ. विशाल पूज्जलवार, कॉ. रमेश कवडो, निकिता पुंगाटी, प्रशांत गोटा, तुषार गोटा आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळाचे अध्यक्ष रामसू कोवासी, साधू कोवासी, रामसू कतवो, क्रीडा प्रमुख एस. एल. कोरसा सर, मंगेश कवडो यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच गाव भूमिया शंकर कवडो यांच्यासह संपूर्ण ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या स्पर्धांमुळे आदिवासी बहुल क्षेत्रात खेळ व शारीरिक संस्कृतीला चालना मिळून युवकांमध्ये एकोपा, शिस्त, आत्मविश्वास व नेतृत्वगुण विकसित होत असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. अशा क्रीडा उपक्रमांमधून आदिवासी भागातील खेळाडूंना राज्यस्तर व राष्ट्रीय स्तरावर जाण्याची संधी मिळावी, यासाठी सातत्याने प्रोत्साहन, मार्गदर्शन व आवश्यक क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले. भविष्यात येथील खेळाडू गाव, तालुका व जिल्ह्याचे नाव राज्य व देशपातळीवर उज्वल करतील, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.






