*क्षेत्रभेट अंतर्गत जिल्हा परिषद शाळांनी राबविला स्वच्छता उपक्रम*
विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण व्हावी, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता राखण्याची सवय लागावी तसेच सामाजिक जबाबदारीची जाणीव विकसित व्हावी या उद्देशाने क्षेत्रभेट उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद शाळांच्या वतीने मुतनूर येथील प्रसिद्ध देवालय परिसरात स्वच्छता उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढेकणी, बावणचुवा, पुसेर व पावीलसनपेठ येथील शालेय विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी देवालय परिसर, प्रवेशद्वारावर साचलेला कचरा गोळा करून परिसर स्वच्छ केला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी “स्वच्छ परिसर, सुंदर समाज” असा संदेश कृतीतून दिला.
सदर उपक्रम मुख्याध्यापक राजेश्वर मूलकलवार, प्रेमानंद गावडे, सुनील सातपुते व देवेंद्र पोटावी यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडला. कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन मट्टामी, माणिक हेडो, संदिप पवार, कोमटी नरोटे तसेच उपाध्यक्ष अशोक कुमोटी, श्यामराव कोवासे, दशरथ पुंगाटी व कविता कोवासे यांची उपस्थिती होती.
यावेळी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व, कचरा व्यवस्थापन, ओला व सुका कचरा वेगळा करण्याचे फायदे तसेच सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे कौतुक करत अशा उपक्रमांतून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी निर्माण होते, असे मत व्यक्त केले.
परिसरातील नागरिक व भाविकांनीही विद्यार्थ्यांच्या कार्याचे अभिनंदन केले. हा उपक्रम स्वच्छ भारत अभियानाला हातभार लावणारा ठरला.






