Home Breaking News लांझेडा वार्डात अरुंद रस्त्यामुळे जीव धोक्यात! प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मोठी दुर्घटना टळली असली...

लांझेडा वार्डात अरुंद रस्त्यामुळे जीव धोक्यात! प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मोठी दुर्घटना टळली असली तरी नागरिक भयभीत?

92

लांझेडा वार्डात अरुंद रस्त्यामुळे जीव धोक्यात! प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मोठी दुर्घटना टळली असली तरी नागरिक भयभीत?

 

आज घर जळाले, उद्या जीव जाईल का? लांझेडातील रस्त्याचा गंभीर प्रश्न

 

दिं : 29/01/2026

 

गडचिरोली: गडचिरोली शहरातील लांझेडा येथील माता मंदिर ते महादेव मंदिराकडे जाणारा मुख्य रस्ता अत्यंत अरुंद असल्यामुळे गावकऱ्यांना दररोज प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याची रुंदी इतकी कमी आहे की एमरजन्सी सेवा, मोठी वाहने तसेच अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचू शकत नाहीत. विशेष म्हणजे या भागातील बहुतांश नागरिक शेतकरी असून, शेतीमाल वाहतूक करणे किंवा आजारी व्यक्तींना रुग्णालयात नेणे देखील मोठे आव्हान बनले आहे.

 

या अरुंद रस्त्याचे भीषण परिणाम 13 जानेवारी रोजी प्रत्यक्ष पाहायला मिळाले. वखरे कुटुंबाच्या घराला अचानक आग लागली. तत्काळ अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. मात्र, माता मंदिरापासून पुढील रस्ता अरुंद असल्याने अग्निशामक वाहन घटनास्थळी पोहोचू शकले नाही.

दरम्यान, गावकऱ्यांनी त्वरित धाव घेऊन स्वतःच्या प्रयत्नांनी आग विझवली, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

तथापि, आगीमध्ये घरातील संपूर्ण संसार जळून खाक झाला. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही, मात्र ही घटना प्रशासनासाठी गंभीर इशारा मानली जात आहे.

 

स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की, वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून या रस्त्याच्या रुंदीकरणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. भविष्यात अशा घटनेत एखाद्याचा जीव गेला, तर त्याची जबाबदारी कोण घेणार? असा थेट सवाल संतप्त नागरिकांनी उपस्थित केला आहे.

 

आज आग लागली, उद्या रुग्णवाहिका अडकली, तर काय?

आज संसार जळाला, उद्या एखादा जीव गेला, तर कोण जबाबदार?

 

प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन माता मंदिर ते महादेव मंदिर हा रस्ता रुंद करावा, अन्यथा लांझेडा गावात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता तरी प्रशासन जागे होणार का, की एखाद्या निष्पाप नागरिकाच्या जीवाची किंमत मोजून?

Don`t copy text!