वरद फेरो अलॉयजच्या विस्तारित प्रकल्पासाठी आज पर्यावरण जनसुनावणी
गडचिरोली: प्रतिनिधी जालना जिल्ह्यातील भोकरदन रोडवरील मे. वरद फेरो अलॉयज प्रा. लि. या कंपनीच्या प्रस्तावित ३x६०० TPD क्षमतेच्या स्पंज आयर्न प्लांट आणि ४० MW वीज प्रकल्पासह अन्य विस्तारित प्रकल्पासाठी १७ फेब्रुवारी २०२६ रोजी जाहीर पर्यावरण जनसुनावणीचे आयोजन करण्यात आले आहे. ही सुनावणी गडचिरोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे सकाळी ११:०० वाजता पार पडणार आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, चंद्रपूर विभागातर्फे ही प्रक्रिया राबवली जात आहे. केंद्र सरकारच्या पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाच्या २००६ च्या अधिसूचनेनुसार, या प्रकल्पाचा पर्यावरणावर होणारा परिणाम आणि स्थानिकांची मते जाणून घेण्यासाठी ही सुनावणी महत्त्वाची आहे.
मे. वरद फेरो अलॉयज कंपनीने आपल्या प्रकल्पात मोठ्या विस्ताराचा प्रस्ताव मांडला आहे.
* स्पंज आयर्न (DRI): ६,१२,००० TPA क्षमता.
* इंडक्शन फर्नेस व इलेक्ट्रिक आर्क फर्नेस: प्रत्येकी ६,६६,००० TPA.
* रोलिंग मिल: ९,००,००० TPA (HBR व RHF).
* वीज प्रकल्प: ४० MW (WHRB) आणि ४० MW (AFBC) क्षमतेचा कॅप्टिव्ह पॉवर प्लांट.
हरकती व सूचना नोंदवण्याचे आवाहन
या प्रकल्पामुळे बाधित होणारे स्थानिक रहिवासी, पर्यावरण प्रेमी संस्था किंवा नागरिक प्रकल्पाबाबतच्या आपल्या सूचना, हरकती किंवा आक्षेप लेखी किंवा तोंडी स्वरूपात नोंदवू शकतात. जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांच्या आत नागरिक आपले म्हणणे प्रादेशिक कार्यालय, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, उद्योग भवन, चंद्रपूर येथे किंवा srochandrapur@mpcb.gov.in या ईमेलवर पाठवू शकतात.
ऑनलाईन सुनावणीची सोय
जे नागरिक प्रत्यक्ष उपस्थित राहू शकत नाहीत, त्यांच्यासाठी वेबिनार (Webex) द्वारे ऑनलाईन सहभागी होण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी मीटिंग नंबर २५१६ ३६८ ८३०६ आणि पासवर्ड १७०२२०२६ वापरून नागरिक सहभागी होऊ शकतात.
या प्रकल्पाशी संबंधित कागदपत्रे आणि माहिती अहवाल गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हा उद्योग केंद्र आणि चामोर्शी तालुक्यातील संबंधित ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये पाहणीसाठी उपलब्ध असल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाने कळवले आहे.






