लांझेडा पुरातन महादेव मंदिरात महाशिवरात्र उत्साहात; दिवसभर धार्मिक कार्यक्रम, भजन-कीर्तन आणि भव्य महाप्रसादाने उसळली भक्तांची गर्दी
गडचिरोली : लांझेडा येथील पुरातन महादेव मंदिरात महाशिवरात्र निमित्त भक्ती, श्रद्धा आणि आध्यात्मिक उत्साहाचा अद्भुत संगम अनुभवायला मिळाला. रविवार दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून संपूर्ण परिसर ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने दुमदुमून गेला.
पहाटे काकड आरतीने कार्यक्रमाची मंगल सुरुवात झाली. त्यानंतर वेदमंत्रांच्या गजरात रुद्राभिषेक, दुग्धाभिषेक, पंचामृत अभिषेक व बेलपत्र अर्पण करण्यात आले. भाविकांनी मोठ्या श्रद्धेने भगवान शंकराचे दर्शन घेतले. दिवसभर मंदिरात भक्तांची अखंड रांग लागलेली दिसून येत होती.
बाल मंडळ,महिला मंडळ व स्थानिक भजन मंडळांच्या वतीने अखंड भजन, कीर्तन व शिवमहिम्न स्तोत्र पठण करण्यात आले. युवकांनी ढोल-ताशांच्या गजरात महादेवाच्या नावाचा जयघोष करत वातावरण अधिक भक्तिमय केले. मंदिर परिसर आकर्षक फुलांची सजावट, विद्युत रोषणाई आणि पारंपरिक सजावटीने उजळून निघाला होता. संध्याकाळी झालेल्या महाआरतीवेळी शेकडो भाविकांनी एकत्र येत भक्तिभावाने आरती केली, ते दृश्य अत्यंत भावपूर्ण व प्रेरणादायी होते.
सोमवारी सायंकाळी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. महाप्रसादासाठी भक्तांची प्रचंड गर्दी उसळली होती. आयोजक समितीच्या वतीने शिस्तबद्ध नियोजन करून सर्वांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. महिलांनी ,युवकांनी व बाल मंडळ स्वयंसेवक म्हणून काम करत व्यवस्था सुरळीत पार पाडली.
या पवित्र पर्वानिमित्त भाविकांनी आपल्या कुटुंबाच्या सुख-समृद्धी, उत्तम आरोग्य, शांती आणि प्रगतीसाठी भगवान शंकर चरणी प्रार्थना अर्पण केली. अनेकांनी उपवास, जप-तप व रात्रजागरण करून शिवभक्तीचा अनुभव घेतला.
संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थ, तरुण मंडळ, महिला मंडळ,बाल मंडळ आणि मंदिर समितीने विशेष परिश्रम घेतले. सर्वांच्या सहकार्यामुळे उत्सव अत्यंत उत्साहात आणि शांततेत पार पडला.
या भक्तिमय सोहळ्यास नगरपरिषद शिक्षण सभापती तसेच प्रभागाचे नगरसेवक हर्षल गेडाम व नगरसेविका कोमल नैताम यांनी उपस्थित राहून भगवान महादेवाचे दर्शन घेतले व आरती मध्ये सहभाग नोंदविला त्यांनी मंदिर समितीच्या कार्याचा कौतुक करत सर्व भाविकांना महाशिवरात्रच्या शुभेच्छा दिल्या
महाशिवरात्र उत्सवामुळे लांझेडा परिसरात भक्ती, श्रद्धा आणि आध्यात्मिक उर्जा यांचे मंगलमय वातावरण निर्माण झाले असून हा सोहळा भाविकांच्या स्मरणात दीर्घकाळ राहील, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.






