*खाजगी पंपांवर इंधन मुबलक, सरकारी पंप कोरडा; एटापल्लीत संशयाची छाया – भाकपाचे सुरज जक्कुलवार व शुभम वनमवार यांची मागणी*
एटापल्ली : पंचायत समिती एटापल्ली अंतर्गत सुरु असलेल्या पेट्रोल पंपावर मागील अनेक दिवसांपासून डिझेल व पेट्रोल उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर भाकपाचे कार्यकर्ते सुरज जक्कुलवार यांनी तहसीलदारांकडे निवेदन देत तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, इंधनाअभावी सर्वसामान्य नागरिकांसह विविध शासकीय कामकाजावरही परिणाम होत आहे. विशेष म्हणजे, खाजगी पेट्रोल पंपांवर इंधन सहज उपलब्ध असताना पंचायत समितीच्या पेट्रोल पंपावर मात्र उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांमध्ये संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.
खाजगी पेट्रोल पंप मालकांना फायदा पोहोचवण्यासाठी जाणीवपूर्वक इंधन पुरवठा रोखला जात आहे काय, अशी शंका नागरिकांकडून व्यक्त केली जात असून, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सुरज जक्कुलवार यांनी केली आहे.
तसेच, संबंधित पेट्रोल पंपावर तात्काळ डिझेल व पेट्रोल उपलब्ध करून द्यावे व इंधन अनुपलब्धतेमागील कारणांची लेखी माहिती द्यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. अन्यथा, या प्रश्नावर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.





