छत्तीसगड सीमेवरील मेंढरीत अखेर वीज; भाकपा पाठपुराव्याला यश
मेंढरी (प्रतिनिधी):
महाराष्ट्राच्या अखेरच्या सीमेवरील, छत्तीसगड राज्यालगत असलेल्या मेंढरी या दुर्गम गावात गेल्या अनेक महिन्यांपासून वीजपुरवठा पूर्णपणे खंडित होता. गावातील ट्रान्सफॉर्मर खराब झाल्यामुळे संपूर्ण गाव अंधारात होते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण, शेतकऱ्यांची कामे तसेच दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम झाला होता.
या गंभीर समस्येमुळे त्रस्त झालेल्या गावकऱ्यांनी अखेर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार यांची भेट घेऊन आपली अडचण मांडली व तात्काळ मदतीची मागणी केली. याची दखल घेत कॉ. सचिन मोतकुरवार व कॉ. सुरज जककुलवार यांनी शासन व प्रशासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला.
सततच्या पाठपुराव्यामुळे संबंधित विभागाने मेंढरी गावासाठी नवीन ट्रान्सफॉर्मर मंजूर करून तातडीने बसवण्याची कार्यवाही केली. अखेर नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आल्याने गावातील वीजपुरवठा सुरळीत सुरू झाला आहे.
वीजपुरवठा पूर्ववत झाल्यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण असून त्यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे व संबंधित पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले आहेत. दुर्गम सीमावर्ती भागातही अशा प्रकारे जनतेच्या प्रश्नांवर तत्परतेने काम व्हावे, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.





